कोरियामध्ये होणार ‘दृश्यम’चा रिमेक, कान्स फेस्टिव्हलमध्ये झाली घोषणा

मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’ हा चित्रपट तुफान चालला होता. त्यामध्ये मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या दमदार यशानंतर कन्नड, तेलुगू, तामीळ आणि हिंदी भाषेत ‘दृश्यम’ प्रदर्शित करण्यात आला. हिंदी ‘दृश्यम’मध्ये अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर ‘दृश्यम’ आता थेट कोरियन भाषेत प्रदर्शित होणार आहे. कोरियन भाषेत रिमेक होणारा ‘दृश्यम’ हा पहिला हिंदुस्थानी चित्रपट ठरणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज आणि दक्षिण कोरियाच्या अँथोलॉजी स्टुडिओने ‘दृश्यम’च्या रिमेकची घोषणा कान्स फेस्टिव्हलमध्ये केली. यावेळी पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगल पाठक आणि अँथोलॉजी स्टुडिओचे जे चोई उपस्थित होते. पॅरासाईट   या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील अभिनेता सॉन्ग कंग हो मुख्य भूमिका साकारणार आहेत, तर दिग्दर्शन किम जी वून करतील.

अँथॉलॉजी स्टुडिओचे सहसंस्थापक जे चोई म्हणाले, चांगल्या  हिंदी चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. परस्पर सहकार्याच्या माध्यमातून आम्ही हिंदुस्थानी आणि कोरियन सिनेमातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पडद्यावर आणू. आम्ही एक अर्थपूर्ण रिमेक बनवू, जो मूळ कलाकृतीप्रमाणेच उत्कृष्ट असेल.