
सामना प्रतिनिधी, मुंबई
1 आणि 2 जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने मध्य रेल्वेच्या सगळ्या मान्सूनपूर्व तयारीवर पाणी फेरले. मिठी नदीचा प्रवाहाचे ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यास निघालेल्या रेल्वे अधिकाऱयांना निराळ्याच कारणांनी माघारी फिरावे लागले. भाभा अणू संशोधन केंद्राच्या सुरक्षेसाठी बसविलेल्या ‘जामर’मुळे मध्य रेल्वेचे हे ड्रोन उडालेच नाही.
पाण्याची पातळी शीव-माटुंगादरम्यान दरवर्षी वाढते, परंतु यंदा नवीनच ठिकाणी पाणी साचले. त्यात कांजुरमार्गमध्ये यापूर्वी कधी पाणी ट्रकवर आल्याचे ऐकिवात नव्हते. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी पेचात सापडले आणि अखेर पालिका अधिकाऱयांच्या मदतीने रेल्वेचे अधिकारी पाण्याचा उगम शोधण्यासाठी कर्वे नगरात तब्बल एक किलोमीटर आतमध्ये शहराच्या हद्दीत घुसले. या तपासणी वेळी एका खासगी विकासकांनी या 100 मीटर रूंदीच्या नाल्यात डेब्रिज टाकून त्याचे तोंडच बंद केल्याने यंदा ट्रकवरचे पाणी हटण्यास वेळ लागल्याचे उघड झाल्याने संबंधित विकासकावर ‘एफआरआर’ दाखल करण्यात आला आहे. कुर्ला नेहरूनगरातील पाण्याचा निचरा का होत नाही याची पाहणी करण्यासाठी अधिकारी पोहोचले तर तेथील कामदार नाला अनधिकृत बांधकामांमुळे आक्रसला होता. जर हे बांधकाम पावसाळ्यात तोडले तर किनारपट्टीचा भाग असुरक्षित होऊन रेल्वेला धोका पोहोचणार असल्याने नंतर हे बांधकाम तोडण्यात येणार आहे.
अखेर जमिनीवरूनच फोटोग्राफी केली
मिठी नदीच्या पाण्याने रेल्वेला घेरल्याने तिचे ड्रोनद्वारे आकाशातून चित्रण करायला गेलेल्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांना येथील सुरक्षेचा फटका बसला. येथून बीएआरसी जवळ असल्याने मिठी नदीच्या पात्राचा अंदाज घेणारे मध्य रेल्वेचे ड्रोनला उडविणारे रिमोटच काम करेनासे झाले. बीएआरसीच्या सुरक्षेसाठी असलेल्या जामरमुळे ड्रोन उडत नसल्याचे नंतर समजले. त्यामुळे जमिनीवरूनच मिठी नदीच्या पात्राची फोटोग्राफी करण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले.




























































