
सामना प्रतिनिधी, गेवराई
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दुष्काळामुळे पाण्यासाठी जनतेची कसरत सुरू झाली आहे. गाव परिसरातील जलस्रोत आटले आहेत. यंदाच्या दुष्काळाची दाहकता मागील पाच वर्षा पेक्षा तीव्र आहे. यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे खरीप आणि रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्राची दुष्काळी पथके येऊन गेली परंतु दुष्काळी उपाय योजना पिण्याचे पाणी व चारा छावण्याशिवाय रोजगारासाठी पर्याय मिळाला नाही, ही शोकांतिका आहे.
पाऊस पडत नाही आला तर बेमोसमी येतो. पेरलं तर उगवत नाही, पिकलं तर मालाला भाव मिळत नाही, गोदावरी व सिंदफणा या दोन नद्या गेवराईच्या बाजुला वेढलेल्या, परंतु गेल्या सात वर्षापासून या तालुक्यात दुष्काळामुळे चक्र बदलले. 10 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन करणारा तालुका उत्पादनात निम्म्यावर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील 66 गावे गोदावरी नदीच्या उत्तर दिशेच्या काठावर वसलेली आहे. तर दक्षिणेला सिंदफणा, मध्यातून पैठण उजवा कालवा प्रवाहित झालेला आहे. एवढे वैभव या तालुक्याला लाभलेले असूनही 2012पासून या तालुक्यात घटलेले पर्जन्यमान यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाणी पातळी खोल गेलेल्या विहिरी व विंधन विहिरीचे प्रमाण वाढलेले अशी परिस्थिती आहे. मात्र हे सर्व दुष्काळी परिस्थितीने कोरडे ठाक पडलेले आहेत. गेवराई तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून गेवराई शहरातील नगरपरिषदेच्या पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा करण्यात येतो. हे पाणी पैठण धरणातून गोदावरी नदी पात्रात शहागडला येते त्यानंतर ते गेवराई पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येऊन महामार्गावरील जलकुभांतुन पाण्याचे शेकडो टँकर आल्यानंतर पाणी पुरवठा ग्रामीण भागात करण्यात येतो, शेकडो टँकर ग्रामीण भागात पाणी पुरवठा करत आहेत.
तालुक्यातील फळबागा भीषण दुष्काळामुळे जळून खाक झाल्या आहेत. काही जण टँकरने पाणी आणुन फळबागा जगवत आहेत. 41 हजार जनावरे शेतकऱ्यांनी 57 छावणीत चाऱ्यासाठी दाखल केली आहेत, गेवराई शहरात नगर परिषदेच्या चार ते पाच दिवसाला पाणी पुरवठा केला जातो, तालुक्यात दुष्काळामुळे पाण्यासाठी जनतेची कसरत सुरू झाली आहे. गाव परिसरातील जलस्रोत आटले आहेत. यंदाच्या दुष्काळाची दाहकता मागील पाच वर्षांपेक्षा तीव्र आहे. यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे खरीप आणि रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.






















































