
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत नशेच्या गुलाबी गोळ्या विकणाऱयाला एएनसी कांदिवली युनिटने अटक केली. प्रशांत पतंगे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 4 लाख 85 हजारांच्या 97 गोळ्या जप्त केल्या.
पुढील महिन्यात मुंबईत पार्टीचा सिझन सुरू होईल. पार्टीमध्ये अमली पदार्थाची तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पूर्वी पार्टीमध्ये तरुण हे कोकेन, चरसची नशा करायचे, पण गुलाबी नशेचा ट्रेंड आला आहे. ‘इक्स्टसी’ या नावाच्या गुलाबी गोळ्यांचा वापर पार्टीकरिता होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण कदम, सावंत, भोसले यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 97 गोळ्या जप्त केल्या. जप्त केलेल्या गोळ्यांची किंमत 4 लाख 85 हजार इतकी आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गोळ्या नेमक्या कुठून आल्या आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
सुसाट नशा
‘इक्स्टसी’ थेट मेंदूवर परिणाम करते. त्यामुळे तस्करांनी या गोळीला ‘ऑडी’ हा कोडवर्ड ठेवला होता. तस्कर दरवर्षी थर्टी फर्स्टपूर्वी ड्रग्जला कोडवर्ड म्हणून कलाकार किंवा चित्रपटाचे नाव देतात.


























































