3 कोटी 86 लाखांचे अमली पदार्थ जप्त 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुन्हे शाखेच्या कक्ष 6 ते 12 युनिटने गेल्या सतरा दिवसांत कारवाई करून सुमारे 3 कोटी 86 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी कारवाई करून 46 जणांना अटक केली आहे.

अमली पदार्थ तस्करांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत गुन्हे शाखेच्या कक्ष 6 ते 12 युनिटने कारवाई करण्यास सुरुवात केली. पश्चिम आणि पूर्व उपनगरात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा आहेत. काही तस्कर हे तरुणांना नशेची सवय लावतात. लव्ह बाईटच्या नावाखाली तरुणांना ड्रग देऊन त्याना नशेच्या जाळय़ात ओढले जाते. अमली पदार्थ तस्कराबाबत तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

गुन्हे शाखेच्या कक्ष 6 ते 12 ने गेल्या सतरा दिवसांत पोलिसांनी कारवाई करून सुमारे 3 कोटी 86 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी एकूण 25 गुन्हे दाखल करून 46 जणांना अटक केली. तर 13 गुह्यांचा तपास स्वतः गुन्हे शाखेचे पोलीस करणार आहेत. पोलिसांनी 17.9 ग्रॅम कोकेन, 5.36 ग्रॅम ब्राऊन शुगर, 1 किलो 884.15 ग्रॅम चरस, 2 किलो 903.355 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.