
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
मलठण कवठे येमाई रस्त्याने पायी येत असलेल्या जैन धर्मगुरुंवर येथील नशेबाज तरुणाने हल्ला करण्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. या घटनेत दोन जैन धर्मगुरू गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ससून पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व पोलीस पथक तातडीने कवठे येमाईत दाखल झाले. रात्री साडे नऊवाजेपर्यंत हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन जैन साधूंवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्या नंतर त्यांना गावातील जैन आराधना भवनमध्ये आणण्यात आले.
जैन मुनींवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. पराग उद्योग समूहाचे प्रमुख देवेन्द्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे व इतर अनेक जैन बांधवांमनी कवठे येमाईत येत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जो पर्यंत या घटनेतील आरोपीस अटक होत नाही व त्याच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत शिरूर आंबेगाव तालुक्यातील जैन बांधव आपापल्या गावात साखळी उपोषण करतील असा इशारा दिला आहे. तर लवकरात लवकर आरोपीस अटक करून त्याच्यावर अत्यंत कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.


























































