
सामना ऑनलाईन । जम्मू
मोदी सरकारने विकासासाठी खूप काही काम केले. निधी दिला, संस्था दिल्या, योजना दिल्या, पण ‘पीडीपी’ने मात्र जम्मू आणि लडाखच्या बाबतीत पक्षपातीपणा सुरूच ठेवला. त्यामुळेच जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने सरकारबाहेर पडून विरोधी पक्षांत बसणे पसंत केले, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे सांगितले. ते जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलिदान दिनाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
जम्मू-कश्मीरमध्ये भाजप-पीडीपी यांचे सरकार बनले तेव्हा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता, त्यात जम्मू-कश्मीरचा समतोल विकास करायचा, जितका विकास खोऱयाचा होईल तितकाच जम्मू आणि लडाखचा केला जाईल, असे ठरले होते, असे सांगून शहा म्हणाले की, जम्मू आणि लडाखच्या विकासासाठी केंद्राने पैसा पाठवला, पण तो तिथे पोहोचलाच नाही. योजनांची अंमलबजावणीही झाली नाही. पाकिस्तानी शरणार्थींसाठी दिले गेलेले १५ हजार कोटी खर्च केले गेले नाहीत.



























































