
कोरोनाव्हायरसची लागण झालेल्यांची संख्या देशात 130 पार गेली आहे तर, महाराष्ट्रमधील रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचा एक बळी गेला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाच्या धोक्यामुळे सर्वांनीच धसका घेतला आहे. याची लागण होऊ नये म्हणून सरकारसह नागरिकही आवश्यक ती काळजी घेत आहे. यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणीही वाढली. मात्र याचा गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली.
कोरोनाचा धसका घेतल्याने प्रत्येक जण जीवाला जपत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून याचाच फायदा काही लोकांकडून घेतला जात आहे. मुंबईत जुने मास्क धुवून विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर आता पुण्यात 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर्स जप्त करण्यात आले. ही माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, पुण्यात गुन्हे शाखेकडून 27 लाखांचे बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 41 झाली आहे. यातील 17 रुग्ण पुण्यातील (पुणे 7, पिंपरी चिंचवड 10), 7 मुंबईतील, नागपुरातील 4, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी 3, रायगड, ठाणे, नगर, संभाजीनगर मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.




























































