शतकाच्या यज्ञातून उसळे एक विजयी ज्वाला

87

>>द्वारकानाथ संझगिरी

रोहित शर्माची बॅट आणि कृष्णाची करंगळी यात एक साम्य आहे. कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. रोहितच्या बॅटने 227 धावांचा पर्वत उचलला. चहलचं गोलंदाजीतलं कर्तृत्व व्यर्थ जाणार नाही हे त्याच्या वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्याशतकाने पाहिलं. ते झंझावाती नव्हते, पण जबाबदारीने खेळणं कसं असतं याचा त्याने ‘वर्ग’ घेतला. कर्णधार बाद झाल्यावर तो वडिलकीच्या भावनेने खेळला. सुरुवातीला त्याने नशिबाकडे हात मागितला; पण नंतर त्या हाताची वज्रमूठ झाली आणि दक्षिण आफ्रिकेला त्याने नॉक आऊट पंच दिला. खेळपट्टीवर फलंदाजी सुरुवातीला सोपी नव्हती; पण एकदा सेट झाल्यावर त्याने विराट, राहुल, धोनीबरोबर भागीदारी करीत 227 धावांचा यशस्वी पाठलाग केला. बुमरा-चहलने भांडवल पुरवलं. रोहितने धंद्यात भरभराट आणली.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजी घेतली तेव्हा साऊथप्टनच्या ‘रोज बाउल’ (जुनं नाव)वर सावळय़ा ढगांनी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून जागा बुक करायला सुरुवात केली होती. तरीही दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. दोनदा पाठलाग करताना दमछाक होऊन कोसळल्यामुळे हा निर्णय घेतला गेला असेल. मुख्य म्हणजे, विराट कोहलीसुद्धा तिसरा वेगवान गोलंदाज घ्यायच्या फंदात पडला नाही. त्याने कुलदीप आणि चहल हे दोन मनगटी गोलंदाज घेतले. आणि तो मास्टर स्ट्रोक ठरला. कारण एकतर खेळपट्टीत बाऊन्स होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा चांगला मनगटी गोलंदाजासमोर ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ सुरू होता.

बुमराने नेहमीप्रमाणे ब्रेक थ्रू दिला. सातत्य हा शब्दाचा अर्थ जसप्रीत बुमरा असा आहे. गेल्या कित्येक सामन्यांत ‘आज बुमराला ठोकून वाढला’ असं अभद्र लिहायची वेळही त्याने कधी आणलेली नाही. बरं एकवेळ शशी थरूर इंग्लिश व्याकरण चुकेल. बुमरा टप्पा, दिशा यात चूक करीत नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या विकेटस्चे उद्घाटन करताना ढगांच्या साक्षीने चेंडू पुढे ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी अपेक्षित चूक केली. चूक सुधारायची संधी रोहित किंवा विराटने उत्कृष्ट झेल घेऊन दिली नाही.

डुप्लेसी आणि डुशेनने पार्टनरशिप फर्म उघडायला सुरुवात केली होती आणि चेंडू मनगटी फिरकी गोलंदाजांच्या हातात आला आणि मनगटी स्पिनशी फलंदाजांचा झिम्मा सुरू झाला. गोलंदाजांच्या हातातून सुटताना चेंडू आत येणार, बाहेर जाणार की सरळ झपकन येणार हे ओळखायची कुवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडे नाही आणि खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर खेळायला लागणारे रिफ्लेसेस त्याच्याकडे नाही. त्यामुळे यावेळी चहलने राज्य केलं आणि त्याला साथ कुलदीपने दिली. चहलने एका षटकात डुशेन आणि डय़ुप्लेसीला बाद केलं. तिथेच दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर गेली. दहा ते 40 षटकं ही धावांचं दूध वाढण्याची षटकं असतात. वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक असतात. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावा घेऊन धावफलकही पळवता येतो. पण चहलने थेट स्पीडब्रेकर्स उभे केले. कधी गुगलीवर विकेट घेतली, कधी स्ट्रेट थ्रूवर, कधी लेगब्रेकवर. त्याचबरोबर कुलदीपने त्याला साथ दिल्यामुळे चहल फास आवळताना पायसुद्धा बांधलेले राहतील हे कुलदीपने पाहिलं. शेवटच्या काही षटकांत मॉरिस-रबाडाच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिका निदान दोनशेचा पल्ला ओलांडू शकली. बुमरा पुन्हा हाणामारीच्या षटकांत आपल्या लौकिकाला जागला आणि भुवनेश्वरकुमारनेही आपली गोलंदाजी विकेटस्च्या बाबतीत वांझोटी ठरणार नाही हे हाणामारीच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पाहिले. त्यांची तरी काय चूक! बुमरा जर धावा घेऊ देत नसेल तर कुणावर तरी हल्ला करायला हवा ना?

हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेच्या अहंकारावर सिगारेट टाकून त्यावरून पाय फिरवावा तसा फिरवला होता. त्याला प्रत्युत्तर देणारं एक अस्त्र्ा दक्षिण आफ्रिकेकडे होतं. त्याचं नाव रबाडा. खेळपट्टीत एकप्रकारचा लहरी बाऊन्स होता. रबाडाने त्याचा फायदा उठवायचं ठरवलं. हलणाऱ्याउसळत्या चेंडूवर धवनने यष्टिरक्षकाच्या हातात झेल देणं ही बातमी नव्हती, पण रोहित शर्मा रबाडाच्या पहिल्या दोन षटकांत दोन मरणं जगला. पण मला त्याचं एक आवडलं की, त्याने रबाडावर एका षटकात दोन चौकार आणि पूलवर एक षटकार ठोकून आगीला आगीने उत्तर दिलं. आता सचिनप्रमाणे कोहलीचं ‘कोहली कोहली’ या गजराने स्वागत होतं. कोहलीने शेवटपर्यंत टिकायचं हा विडा उचलल्यासारखा वाटला. पण पुन्हा बाऊन्स आणि डिकॉकच्या एका अफलातून झेलने त्याचं स्वप्न भंग झालं. सुदैवाने रोहितशी दोस्ती केल्यावर त्याच्या बॅटने धावांशी दोस्ती निभावण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे अत्यंत गंभीरपणे, शिस्तबद्धपणे केला. हिंदुस्थानी संघाला धावांसाठी दक्षिण आफ्रिकेने मधल्या षटकांत झगडायला लावलं. त्यात सिंहाचा वाटा मॉरिसचा होता. त्याच्या अचूक टप्पा आणि दिशेने साक्षात बुमराला विचार करायला लावला असेल. वर्तुळाबाहेर चार क्षेत्ररक्षक असताना त्याने चक्क दोन निर्धाव षटकं टाकली आणि एक चौकाराचा वळ अंगावर उठल्यावर मुलीने नकार दिल्यावर चेहरा टाकावा तसा चेहरा टाकला. राहुल चौथ्या क्रमांकाची जबाबदारी उचलतोय हे शब्द तोंडातून बाहेर यायला आणि तो मिडऑफला साधा झेल देऊन बाद व्हायला एकच गाठ पडली. तो खेळला आत्मविश्वासाने. पण अचानक विश्वासघात करायची त्याची सवय जायला हवी. भागिदारी तोडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने रबाडाला आणलं. पण तोसुद्धा क्रिकेटची बक्षिशी घेताना आश्चर्यचकित झालेला वाटला.

महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दक्षिण आफ्रिकेनेही एक चायनामन आणि एक लेगस्पिनर घेतले होते. जणू विराट आणि डुप्लेसीने रात्री चर्चा करून ठरवलं होतं. पण हिंदुस्थानी मनगटी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा कणा मोडला आणि दक्षिण आफ्रिकेचे मनगटी गोलंदाजी हिंदुस्थानी धावसंख्येचा कणा ठरले. पण तरीही रोहित शर्मा उभा राहिला नसता तर 227 ही खडतर वाटल्या असत्या. वनडेतही जिंकण्यासाठी भागिदारी आवश्यक असतात. त्याने त्या विराट, राहुल, धोनीबरोबर उभारल्या. पण इतर त्यांच्याबरोबर होते. तो इतरांबरोबर नव्हता. सुरुवातीला रबाडाच्या उसळत्या चेंडूने त्याला त्रास दिला. पण चेंडू किंचित जुना झाल्यावर त्याने उसळते चेंडू त्याच्या टिपिकल शैलीने पुल केले. पुल हा त्याला जन्मोजन्मी साथ देणारा त्याचा फटका वाटतो. पण त्याने चेंडू स्विप केले, कट केले. अपर कट मारले. सर्व फटके त्याचे भक्त असताना त्याला एका भक्तावर अवलंबून राहावे लागत नाही. सर्व फटके नावाचे भक्त त्याच्या पायाशी जमले आणि त्याने हिंदुस्थानला विजयाकडे नेले.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या