
>> मानसी पिंगळे
अभिनेता आदिश वैद्य हा फिटनेसप्रिय कलाकार आहे. मराठी चित्रपट, मालिका त्याचबरोबर हिंदी शोमध्येसुद्धा काम करत असताना वेगवेगळय़ा ठिकाणी वेगवेगळे शूट सुरू असल्यामुळे प्रत्येक वेळी खाण्याच्या वेळा पाळणे, डाएटवर लक्ष देणे शक्य होत नसे. त्यामुळे तो आठवडय़ातील किमान चार दिवस नियमितपणे जिमला जात असे. एकवेळ आहारात थोडे फार बदल झाले तरी हरकत नाही, पण व्यायामाच्या बाबतीत अजिबात टाळाटाळ नाही. व्यायाम हा काटेकोरपणेच केला गेला पाहिजे.
आदिश जितक्या काटेकोरपणे फिटनेसवर भर देतो, तितकाच फुडीसुद्धा आहे. घरगुती जेवणावर जास्तीत जास्त भर देत आहारात अंडी, पनीर, रताळे, भाज्यांचे, फळांचे सलाड, भाकरी, सूप, पोहे, ओट्स अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. आदिशच्या मते, फिटनेस म्हणजे फक्त घरचे जेवण नव्हे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून दोनदा डाएटपलीकडील स्ट्रीट फूड, जंक फूड खाल्ले तरी हरकत नाही. पण तितक्याच जोमाने व्यायामसुद्धा केला गेला पाहिजे. स्ट्रीट फूड, चमचमीत पदार्थांवर आदिशचे भारी प्रेम आहे. मोमोज, डोसा, पावभाजी, पाणीपुरी, वेगवेगळे चाट्स हे त्याच्या आवडीचे पदार्थ. कोल्हापूरची मिसळ, पुण्यातील वेगवेगळय़ा ठिकाणांवरील डोसा असेल, मुंबईतील पाणीपुरी हे पदार्थ आदिशच्या अगदी जवळचे. ज्यांची चवही कायम जिभेवर रेंगाळते. साऊथ इंडियन ब्रेकफास्टवर आदिशचे विशेष प्रेम आहे.
त्याने हल्ली नॉनव्हेज खाणे कमी केलेय. नवनवीन पदार्थ बनवायला आणि इतरांना खाऊ घालायला त्याला फार आवडतात. पनीरचे पदार्थ, मशरूमचे पदार्थ, आम्लेट, पॅरमेल ब्रेड पुडिंग हे आदिश स्वतः बनवून शूटिंगदरम्यान सेटवर सर्वांना खाऊ घालतो. पण त्याच्या हातच्या पॅरमेल ब्रेड पुडिंगला त्याच्या मित्रपरिवारात भलतीच पसंती आहे.
आदिश म्हणतो, एकच आयुष्य आहे. त्यामुळे आवडेल ते सगळे खा, फक्त योग्य प्रमाणात. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की, त्याचे दुष्परिणाम होतात.






























































