भयंकर! आर्थिक ताणामुळे संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

आर्थिक ताणामुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची भयंकर घटना गाझियाबाद येथे घडली आहे. या प्रकरणात पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबाद मधील इंदिरापुरम येथे हे कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा प्रमुख गुलशन कुमार याने राकेश वर्मा नावाच्या माणसाला दोन कोटी रुपये उधार दिले होते. पण त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. राकेश याने दिलेले चेकही बाउन्स झाले होते. राकेश वर्मा आणि गुलशन कुमार नात्याने एकमेकांचे साडू आहेत. पैसे परत न मिळाल्याने कुमार याने आपली पत्नी प्रवीण, एक महिला संजना यांच्या समवेत मंगळवारी पहाटे राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केली.

पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर कुमार कुटुंबाने आपली अखेरची इच्छा व्यक्त केली आहे. आमची इच्छा अशी आहे की, आमच्या प्रेतांना एकत्र अग्नी देण्यात यावा, असं कुमार यांनी मरण्यापूर्वी भिंतीवर लिहिलं आहे. तसंच भिंतीवर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये राकेश वर्मा यालाच आपल्या आर्थिक ताणाला कारणीभूत असल्याचं कुमार याने म्हटलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.