
सामना ऑनलाईन, मुंबई
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा परिणाम आता दिसायला लागला आहे. मुंबई शहरातील दूध पुरवठा कमी झाला असून त्यात भर पडलीय ती अंडी महागण्याची. दूध-पाव किंवा आम्लेट पाव हा नाश्ताचा स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे. मुंबईमध्ये अंड्याचे दर डझनामागे किमान १० रूपयांनी महागल्याने सामान्य नागरिक वैतागले आहेत.
वांद्रे परिसरात अंडी ७० ते ८० रूपये डझन या दराने विकली जात आहेत. गोरेगांव परिसरात अंडी ७२ रूपयांनी विकली जात आहेत तर वाशीच्या घाऊक बाजारात अंडी ६५ ते ७० रूपये डझन या दराने विकली जात आहेत. पावसाळ्यात कोंबड्या अंडी कमी देतात, श्रावण सुरू होण्यापूर्वी अंड्यांना मागणी बरीच असते. मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने अंड्याचे भाव वाढले असल्याचं चेन्नईतील अंडीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाने म्हटले आहे.



























































