
सातारा येथील मंगळवार पेठेतील मनामती चौकामध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत दहशत माजविल्याच्या गुह्यामध्ये येथील एएम गँगच्या प्रमुखासह आठजणांवर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळीप्रमुख आमिर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी), आमीर सलीम शेख (20, वनवासवाडी, कृष्णानगर), अबू ऊर्फ अभिषेक राजू भिसे (वय 20, रा. काळे वस्ती, सैदापूर, सातारा), साहिल विजय सावंत (वय 20, रा. माजगावकरमाळ झोपडपट्टी), आहद आयुब आतार (रा. शनिवार पेठ), ओंकार राजू भिसे (वय 21, रा. काळे वस्ती, सैदापूर), संग्राम विजय जाधव (वय 20, रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश आहे.
दि. 4 ऑक्टोबरला येथील सेंट पॉल स्कूलच्या मैदानात दांडियाचा खेळ खेळला जात होता. यावेळी संजय बिडकर व त्याचा मित्र सर्वेश महाडिक गेटसमोरील रस्त्याने जात होते. यावेळी अभिजित भिसे याने सर्वेश महाडिक याच्या पायावर गाडी घातली. गाडीवर मागे असलेल्या आमिर शेख व त्यांच्यात वादावादी झाली. त्या वादातून दुसऱया दिवशी रात्री आमिर मुजावर याच्या सांगण्यावरून संशयित मनामती चौकात गेले. यावेळी तेथे असलेल्या यश बिडकरवर गोळीबार केला. तो खाली बसला, त्यामुळे गोळी त्याला लागली नाही. यावेळी तेथे घडशीकाका यांनी शेखला असे करू नको, असे सांगितले. त्यावेळी त्याने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून खटका ओढला; परंतु, मिसफायर झाल्याने त्यांना गोळी लागली नाही. संशयितांनी कोयता हातात घेऊन यशचा पाठलाग केला. त्यावेळी परिसरातील लोकांनी त्यांना पकडल्यामुळे अनुचित प्रकार घडला नव्हता.
शहर परिसरात अशाप्रकारे टोळीने गुन्हे करणाऱयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिल्या होत्या. दरम्यान, या गुह्याच्या तपासामध्ये आमिर मुजावर याने कट रचून त्याच्या एएम टोळीतील सदस्यांचा वापर करून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पतंगे यांनी या टोळीविरुद्ध माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध या गुह्यात मोक्काचे कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांमार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्याला विशेष महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर, हवालदार अमित सपकाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पतंगे, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, सतीश बाबर, सुनील भोसले हे सहभागी झाले होते.




























































