
गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना राबवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यानुसार मुलगी जन्माला आल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत शासनाकडून तिच्या बँक खात्यात वयाच्या टप्प्यानुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली जाणार आहे. पिवळय़ा व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे.
नमो शेतकरी योजनेला मंजुरी
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने आज मान्यता दिली. दोन-दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
मराठवाडा विद्यापीठाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात आता औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. यामुळे या विद्यापीठाचे नाव यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर असे होईल. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतरही मराठवाडा विद्यापीठाच्या नावासमोर औरंगाबाद असाच उल्लेख होत होता. आता या विद्यापीठासमोर नमूद जिह्यांच्या सूचीतदेखील औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादऐवजी धाराशीव असा बदल करण्यात येणार आहे.



























































