
वृद्धाच्या घरी दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या चोरटय़ाला अखेर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. विकास सोमा पवार असे त्याचे नाव आहे. चोरी केल्यानंतर तो शिर्डीला त्याच्या भावोजींच्या घरी गेला होता. त्याच्याकडून 2 लाख 16 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
बोरिवली येथे ज्येष्ठ नागरिक राहतात. गेल्या महिन्यात ते बोरिवलीच्या दत्तपाडा येथे त्यांच्या मुलीला भेटायला गेले होते. सायंकाळी ज्येष्ठ नागरिक घरी आले तेव्हा घरी घरपह्डी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातून 2 लाख 13 हजारांचा ऐवज चोरी प्रकरणी त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. वृद्धाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, नितीन तडाखे, सहायक निरीक्षक ओम तोटावार उप निरीक्षक राहुल वाळुंजकर आदी पथकाने तपास सुरू केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी 73 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये विकास हा रेल्वे नजीकच्या भिंतीवरून चढून येत असल्याचे दिसला. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. विकास हा लोकलने मालाड येथे उतरला. त्यानंतर तो पायी मालवणी येथे गेल्याचे फुटेजमध्ये उघड झाले.
पथकाने शिर्डीतून केली अटक
विकास हा शिर्डीला त्याच्या भावोजीकडे गेल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक शिर्डीला गेले. तेथून त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. कसून चौकशी केल्यावर त्याने घरपह्डीची कबुली दिली. त्याने चोरलेले ते दागिने वसई येथे एका भंगारवाल्याकडे ठेवायला दिले होते. विकासला अटक करून न्यायालयात हजर केले होते.



























































