नगर शहर बँकेसाठी अवघे 24.75 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी काल रविवारी (दि. 29) मतदान पार पडले. मात्र, या निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आला. एकूण 12 हजार 110 पैकी अवघ्या दोन हजार 997 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजाविला. त्याची टक्केवारी अवघी 24.75 एवढी आहे. मतमोजणी सोमवारी (30 रोजी) ओम गार्डन येथे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

नगर शहर बँकेची निवडणूक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सत्ताधारी पॅनलमध्ये दोन विद्यमान संचालकांना डावलल्यामुळे त्या संचालकांच्या नातेवाईकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये माजी संचालक सतीश अडगटला यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर माजी संचालक मच्छिंद्र शेत्रे हेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. शहर सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, असे सुरुवातीला वाटले होते; पण तसे झाले नाही. गेल्या 15 दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती.

शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागा असून, त्यातील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झालेली आहे. उर्वरित 14 जागांसाठी काल मतदान पार पडले. बँकेच्या निवडणुकीसाठी शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये एकूण 30 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.

सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी दिसली नाही. प्रत्येक केंद्रावर 400 मतदार याप्रमाणे मतदानाचे नियोजन करण्यात आले होते. त्यात मतदान केंद्र क्रमांक 30वर सर्वाधिक 510 मतदार होते. तेथेच सर्वांत जास्त 202 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर सर्वाधिक कमी मतदान केंद्र क्रमांक 27वर झाले. तेथे 400 मतदारांपैकी अवघ्या 59 मतदारांनी आपला हक्क बजावला.

शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाचे ‘सुयश पॅनल’विरुद्ध अपक्ष अशी लढत पाहायला मिळत आहे. संजय घुले यांच्या रूपाने बिनविरोध झालेली एक जागा यापूर्वीच ‘सुयश पॅनल’ने जिंकली आहे. उर्वरित 14 जागांमध्ये काही अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत असून, त्यात त्यांना कितपत यश येते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.