
सामना प्रतिनिधी । नांदेड
हदगाव तालुक्यातील बाजार समित्यांची निवडणूक येत्या २२ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी २३ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज पंचायत समिती हदगावच्या सभागृहात स्विकारले जातील. उमेदवारी अर्जाची छाननी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल. वैध उमेदवारी अर्जाची यादी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर पर्यंत आहे. ११ डिसेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. त्याच दिवशी अंतिम यादीचे प्रकाशन करण्यात येईल. २२ डिसेंबरला आवश्यकता वाटल्यास मतदान घेण्यात येईल. आणि २३ डिसेंबरला सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. सर्व मतदान इव्हीएमने घेण्यात येईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी लहुराज माळी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हदगावचे तहसीलदार संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना सहाय करण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक ए.जे.भिल्लारे आणि नायब तहसीलदार जे.डी.हराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आरक्षण खालीलप्रमाणे. तळणी-विमुक्त भटक्या जाती (मतदार संख्या ४११४), शिरड-सर्वसाधारण (मतदारसंख्या ४०७२), धानोरा-अनुसूचित जाती जमाती (मतदारसंख्या ४१४७), कोळी-महिलांसाठी (मतदारसंख्या ४२८०), तालंग-सर्वसाधारण (मतदारसंख्या ४३५१), पळसा-महिलांसाठी (मतदारसंख्या ३९०९), हदगाव-सर्वसाधारण (मतदारसंख्या ४०१९), हरडफ-सर्वसाधारण (मतदारसंख्या ३८८९), तामसा-सर्वसाधारण (मतदारसंख्या ४१५५), सावरगाव-सर्वसाधारण (मतदारसंख्या ३९२३), चाभरा-सर्वसाधारण (मतदारसंख्या ३६०९), मांडवा-इतर मागासवर्गीय (मतदारसंख्या ३७९४), पिंपळगाव-सर्वसाधारण (मतदारसंख्या ३६५६), आष्टी-सर्वसाधारण (मतदारसंख्या ४०९५), कांडली बु.-सर्वसाधारण (मतदारसंख्या ३८३६). याशिवाय व्यापारी दोन गण आणि हमाल मापाडी एक गण अशा एकूण १८ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मतदारांची एकूण संख्या ६०२७१ इतकी आहे. आचारसंहिता आजपासून लागू झाली असून, त्याचे पालन कठोरपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.































































