
खेड तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्या असून ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखताना दिसू लागले आहेत. खेड तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्येच खरी लढत असून तिन्ही पक्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. या आधी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होत असे, मात्र अलीकडे बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे उद्धव ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत सरपंचपदाची निवड लोकनियुक्त सदस्य नाही, तर जनता करणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गावचा विकास साधला जातो. ज्या राजकीय पक्षाकडे तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती त्या पक्षाचे तालुक्यावर वर्चस्व, असे राजकीय गणित असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून तालुक्यात राजकीय ग्रामीण भागातील राजकारणाला जाग आली आहे. निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांची ये-जा वाढलेली पाहावयास मिळत आहेत. तालुक्याच्या राजकारणात दुसऱ्या फळीत काम करणारी नेतेमंडळी गावात पायधूळ झाडताना दिसू लागली आहे. त्याची ऊठबस करताना गावपातळीवर काम करणाऱ्या गावपुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
खेड तालुक्यातील अलसुरे, भेळसई, भोस्ते, चिंचवली, घाणेखुंट, कळंबणी बुद्रुक, कोंडिवली, निळीक, संगलट, तिसंगी या दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या गावातील राजकारण चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे. ज्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत त्यापैकी काही ग्रामपंचायतींच्या काही जागा बिनविरोध झाल्या आहेत, मात्र ज्या जागांसाठी 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्या जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.
खेड तालुका हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे या तालुक्यावर शिवसेनेचेच वर्चस्व होते, मात्र अलीकडे सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 5 डिसेंबर रोजी म्हणजे उद्या होणार असून 7 डिसेंबर ही तारीख अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले की, खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.






























































