खेड नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत बसवणार अत्याधुनिक विद्युत शवदाहिनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत अत्याधुनिक विद्युत शवदाहिनी लवकरच बसवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेले अनेक मृतदेह स्मशानभुमीत येत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत होत्या; पण आता या स्मशानभुमीत अत्याधुनिक विद्युत शवदाहिनी बसवली जाणार असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे सोपे होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या विशेष निधीतून खेड नगरपरिषदेसाठी अत्याधुनिक विद्युतदाहिनीला मंजुरी मिळाली आहे.

खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 52 जणांवर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे 8 कर्मचारी कोरोनाबळीच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम गेले अनेक महिने करत आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाबळींची संख्या वाढत आहे.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणल्या जाणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढली असल्याने जळाऊ लाकूड कमी पडू लागले आहे. जळाऊ लाकूड कमी पडू नये यासाठी नगरपालिका प्रशासन खबरदारी घेत आहे, मात्र कोरोनाबळींची वाढती संख्या नगरपरिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर खेडसाठी विद्युत शवदाहिनी मिळावी, अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्मशानभूमीची माहिती घेतली आणि त्यांच्या विशेष निधीतून खेडसाठी अत्याधुनिक शवदाहिनी मंजूर केली. ही शवदाहिनी लवकरच स्मशानभूमीत बसवली जाणार असल्याने कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार करणे सोपे होणार आहे.