तीन दिवसांत साडेतीन कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील वीजगळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या विशेष भरारी पथकांनी गेल्या तीन दिवसांत राज्यात वीजचोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. त्यामध्ये 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, वीजचोरींमध्ये घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या मोठी आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिलदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार एकूण 383 वीजचोरीची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर परिक्षेत्रांतर्गत 121 वीजचोरीची प्रकरणे समोर आली आहेत. कोकणमध्ये 117, छत्रपती संभाजीनगरमध्ये 92 तर पुणे परिक्षेत्रात 53 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.