ट्रन्स्फार्मची 3 लाखांची तांब्याची तार लंपास, राहुरी येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

250 केव्ही क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड करून चोरटय़ांनी 3 लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी पोलीस हद्दीत असलेल्या मोकळओहोळ शिवारातील उजवा कालव्याजवळ ही घटना घडली. 6 महिन्यांपूर्वी याच लिप्टवर बसविण्यात आलेले 10 अश्वशक्तीचे तब्बल 11 मोटरपंप चोरीस गेले आहेत. या घटनेचा तपास लागलेला नसतानाच ट्रान्स्फॉर्मर फोडून लाखो रुपयांची तांब्याची तार चोरीची दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

राहुरी सहकारी साखर कारखान्याकडून मोकळओहोळ भागात 40 वर्षांपूर्वी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. या लिप्टवर सध्या रेणुकामाता पाणी वापर संस्थेचा हक्क आहे. परिसरातील 1200 एकर शेतीला या लिफ्टच्या पाण्याचा लाभ होत असल्याने शेतकऱयांच्या दृष्टीने या लिफ्टला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याच्या वितरण व्यवस्थेसाठी लिफ्टवर 250 के. व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला असून, थकबाकीमुळे गेल्या काही महिन्यांपासून ही लिफ्ट बंद आहे. रविवारी रात्री चोरटय़ांनी बंद ट्रान्स्फॉर्मरचा कॉक सुरू करून शेकडो लिटर ऑइल खाली सोडून दिले. या पाठोपाठ ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड करून अंदाजे तीन लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनास्थळी लोखंडी टॉमी तसेच धुळे, मालेगाव नाव असलेला टीशर्ट आढळून आला आहे.

पोलीस पाटील शांताराम कदम, सरपंच भानुदास कदम, जयराम औटी, बन्शी पवार, राजेंद्र कदम, श्याम कदम, रंगनाथ कदम, भाऊराव कदम यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस नाईक सुशांत दिवटे यांनी पंचनामा केला.

मोकळओहोळ परिसरात कांदा, ऊस तसेच जनावरांचा चारा ही पिके उभी आहेत. मार्च महिन्यात लिफ्टवरील थकबाकी वसुलीचे काम सुरू करून लिफ्टच्या पाण्याचा वापर करण्याच्या तयारीत शेतकरी होते. मात्र, चोरीच्या घटनेने शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी देणे तूर्त शक्य राहिले नाही. नवीन ट्रान्स्फॉर्मर देण्याची मागणी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मोकळओहोळ येथील शेतकऱयांनी दिली.