
पहिला सामना जिंकणारा ऑस्ट्रलियन संघ येथे झालेल्या दुसऱया लढतीत 232 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 144 या धावसंख्येवर पोहोचला होता. यावेळी त्यांना विजयासाठी 88 धावांची आवश्यकता होती तसेच 19.1 षटकांचा खेळ शिल्लक होता, पण यावेळी ख्रिस वोक्सने कर्णधार ऍरोन फिंचसोबत खेळपट्टीवर दमदार फलंदाजी करीत असलेल्या मार्नस लॅबुशेनला 48 धावांवर पायचीत बाद केले आणि सामन्याला कलाटणी मिळाली. येथून ऑस्ट्रेलियन डावाला सुरुंग लागला. ऑस्ट्रेलियाने 64 धावांमध्ये आठ बळी गमावले. इंग्लंडने सामना फिरवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 24 धावांनी लढत जिंकणाऱया इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टोयनीस व मिचेल मार्श यांना 34 धावांच्या मोबदल्यात पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
नवव्या विकेटसाठी 76 धावांची निर्णायक भागीदारी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या 39 धावा व ओएन मॉर्गनच्या 42 धावा वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान थोपवता आले नाही. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 8 बाद 149 धावा अशी बिकट झाली. इंग्लंडला या संकटातून टॉम करण व अदिल रशीद या जोडीने बाहेर काढले. दोघांनी नवव्या विकेटसाठी 76 धावांची सणसणीत भागीदारी रचली. टॉम करणने पाच चौकारांसह 37 धावांची तर अदिल रशीदने एक षटकार व तीन चौकारांसह नाबाद 35 धावांची खेळी केली. इंग्लंडने 9 बाद 231 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झाम्पाने तीन आणि मिचेल स्टार्कने दोन फलंदाज
बाद केले.
वोक्स, आर्चर, करण बंधूंची कमाल
इंग्लंडच्या 232 धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर (6 धावा) व मार्कस स्टोयनीस (9 धावा) यांना 37 धावांमध्ये गमावल्यानंतर ऍरोन फिंच व मार्नस लॅबुशेन या जोडीने 107 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिले, पण ओएन मॉर्गन याच्या कुशल नेतृत्वाची झलक यावेळी पाहायला मिळाली. जोफ्रा आर्चर व ख्रिस वोक्स या आपल्या अव्वल गोलंदाजांना त्याने गोलंदाजीस बोलावले. ख्रिस वोक्सने मार्नस लॅबुशेनला बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर एक षटकार व आठ चौकारांसह 73 धावांची खेळी साकारणाऱया ऍरोन फिंचचाही ख्रिस वोक्सनेच त्रिफळा उडवला. ऍलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. ख्रिस वोक्सने 32 धावा देत तीन, तर सॅम करणने 35 धावा देत तीन फलंदाज बाद केले. टॉम करणने दहा षटकांमध्ये दोन षटके निर्धाव टाकली व अवघ्या 28 धावा दिल्या. त्याने फलंदाजीतही आपली चुणूक दाखवताना निर्णायक क्षणी 37 धावा केल्या होत्या. कांगारूंचा डाव 207 धावांवरच संपुष्टात आला.




























































