इंग्लंड २८ वर्षांनंतर फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | समारा

२१ व्या फिफा विश्वचषकात आरंभापासूनच शिस्तबद्ध खेळ करणाऱ्या इंग्लंड संघाने स्वीडनचे आव्हान २-० असे सहज संपुष्ठात आणून सुमारे २८ वर्षांनी उपांत्य फेरीत मजल मारली . इंग्लंडच्या या नेत्रदीपक विजयाचे शिल्पकार ठरले ते हेडरने गोल नोंदवणारे हॅरी मॅग्वायर आणि डेले अली हे इंग्लंडचे युवा फुटबॉलस्टार. कर्णधार हॅरी केन याच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या युवा इंग्लंड संघाचे फुटबॉल जगतात मोठे कौतुक होत आहे .उपांत्य लढतीत इंग्लंडला यजमान रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील विजयी संघाशी झुंजावे लागणार आहे.

कर्णधार हॅरी केन आणि प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी यंदा युवा इंग्लिश फुटबॉलपटूंकडून चमकदार कामगिरी करून घेत इतिहास साकारला. यापूर्वी १९९० मध्ये फिफा विश्वचषकाचे उपांत्य फेरी गाठली होती. आज इंग्लंडच्या वतीने हॅरी मॅग्वायरने लढतीच्या ३० व्या मिनिटाला हेडरने गोल नोंदवत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात ५८व्या मिनिटाला डेले अलीने पुन्हा डोक्याचाच वापर करीत दुसरा हेडर गोल नोंदवत इंग्लंडला २-० अशी शानदार आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेर निर्णायक ठरली.इंग्लंडचा गोलरक्षक पिकफोर्डने आज पुन्हा अफलातून गोलरक्षण करीत स्वीडन संघाची आक्रमणे समर्थपणे थोपवली. त्यामुळेच इंग्लंड संघ आपली नैय्या शानदार विजयाकडे नेऊ शकला .