राज्यातील सर्व शाळांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी प्रयत्न करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक सेवा-सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करुन विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये आता आर्थिक साक्षरता अभ्यासक्रमाच्या रुपाने मोलाची भर पडली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसह समाजासाठी, देशासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर शहरांमध्ये, शाळांमध्ये आणि शेतकऱ्यांपर्यंत देखील आर्थिक साक्षरता नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. च्या यांच्या संयुक्त प्रयत्नातून आर्थिक साक्षरता मिशन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या मिशनचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीतील आंतरराष्ट्रीय सभागृहात सोमवारी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. यांच्या दरम्यान आर्थिक साक्षरता मिशन संदर्भात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची प्रत देवाण-घेवाण याप्रसंगी करण्यात आली. तसेच आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तिका देखील यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली.

समारंभात मार्गदर्शन करताना पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत आहे. असे असले तरी ज्याप्रमाणे सिग्नलवरचे लाल-हिरवे दिवे कळतात, तितकीच मर्यादित माहिती भांडवली बाजारातील लाल-हिरव्या खुणांवरुन बहुतेकांना कळते. मुळात भांडवली बाजार अर्थात स्टॉक मार्केटला जुगार मानण्याचा रुढ समज आता दूर झाला पाहिजे. पैसा कमावणं, त्यातून बचत करणं, गुंतवणूक करणं, परतावा मिळवणं या सर्व गोष्टी आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाच्या आहेत. समाज आणि देशाला पुढे न्यायचे असेल तर, प्रत्येक व्यक्तिच्या हातात, बँक खात्यात आणि गुंतवणुकीत देखील पैसा असणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील इतर शाळांमध्ये तसेच शेतकऱ्यांपर्यंत देखील आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आणखी 3 वर्षांनी दीडशे वर्ष पूर्ण करीत असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने त्यासाठी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये पर्यटकांना येता यावे, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारती आकर्षक आणि सर्व सुविधापूर्ण केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी 54 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना टॅब दिले गेले आहेत. 600 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उपक्रम राबवला जात आहे. आता स्मार्टबोर्ड उपलब्ध करुन दिले जातील. संगणक प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत मिळून वेगवेगळे क्रीडाप्रकार, कला, बॅलेसारखे नृत्यप्रकार विद्यार्थ्यांना शिकता येत आहेत. स्वच्छता, लैंगिक समानता यासारखे सामाजिक पैलू विकसित केले जात आहेत. शिक्षण खात्यातील या बदलांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकारदेखील वाढवून दिले, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अवघ्या 45 दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याने आर्थिक साक्षरता मिशन प्रत्यक्ष सुरु केले असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्याबद्दल शिक्षण खात्याचे कौतुकदेखील केले.

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, आर्थिक साक्षरता मिशन हा स्तुत्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाची परंपरागत चौकट मोडून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. माती ओली असतानाच त्याला आकार देणे गरजेचे असते. विद्यार्थीदशेतच आर्थिक साक्षरता प्राप्त झाली तर, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबदेखील आर्थिक सक्षम होईल. सरस्वतीपूजक, शस्त्रपूजक असलेला मराठी माणूस लक्ष्मीपूजक देखील झाला पाहिजे, असे सांगून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कधीकाळी विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यावरुन मुंबई महानगरपालिकेवर टिका केली जात होती. आता महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांग लागते आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मंडळांचे अभ्यासक्रम सुरु झाल्याने पालकांचा विश्वास वाढला आहे. त्यात आता आर्थिक साक्षरतेची मुहूर्तमेढ करणारा अभ्यासक्रम सुरु झाल्याने प्रत्येकाला अभिमान वाटेल. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळतील, ते या संधीचे सोने करतील, असा आशावाद व्यक्त करतानाच शिक्षण खात्याचे देखील त्यांनी कौतुक केले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आशीष कुमार चौहान म्हणाले की, सुमारे 147 वर्षांची परंपरा असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जगात भांडवली बाजारांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या 30 टक्के संपत्ती या एकट्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमुळे निर्माण झाली आहे. देशातील 10 कोटी लोक आता भांडवली बाजारात गुंतवणूक करतात. देशातील प्रत्येक नागरिकाला पैसा कसा कमवावा, बचत कशी करावी, गुंतवणुकीतून संपत्तीची वृद्धी कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक संकट टाळण्यासाठी कर्ज व उधारीची परतफेड कशी करावी, हे कळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच महिलांना देखील आर्थिक स्वावलंबानाचे धडे दिले जाणे गरजेचे आहे, असे चौहान यांनी नमूद केले. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातूनच आर्थिक साक्षरता मिशन सुरु करण्यात आले आहे, याचा आवर्जून उल्लेख करीत समाज सुदृढ करण्याचे काम यातून होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सह आयुक्त अजीत कुंभार यांनी प्रास्ताविक करताना आर्थिक साक्षरता मिशनचे स्वरुप स्पष्ट केले. या मिशनमध्ये 100 मास्टर ट्रेनर्सना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांपर्यंत आर्थिक ज्ञान पोहोचविण्यासाठी मोलाची मदत होईल. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचविले जाईल, असे सांगून शिक्षण विभागाच्या कामगिरीत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावादेखील कुंभार यांनी सादर केला. किसन पावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.