
देशातील सर्वसामान्य नोकरदारवर्गासाठी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा गुरुवारी केली. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवरील व्याज 8.5 टक्क्यांवरच स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे व्याजदर गेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच कायम राहतील. त्यामुळे देशभरातील तब्बल सहा कोटी नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची गुरुवारी श्रीनगर येथे बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत ईपीएफओच्या वेगवेगळ्या स्रोतांच्या गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित या समितीने व्याजदरासाठी आढावा अहवाल सादर केला. या अहवालात व्याजदर जैसे थे ठैवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार ट्रस्टींच्या बैठकीत वरील निर्णय घेतला आहे.
गेल्या दहा वर्षांतील व्याजदर
आर्थिक वर्ष व्याजदर (टक्के)
- 2012-13 8.5
- 2013-14 8.75
- 2014-15 8.75
- 2015-16 8.8
- 2016-17 8.65
- 2017-18 8.55
- 2018-19 8.65
- 2019-20 8.50
- ट्रस्टींच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर आता त्याच्या शिफारशी वित्त मंत्रालयाकडे पाठविल्या जाणार आहे. जर वित्त मंत्रालयाने या शिफारशींचा स्वीकार केल्यास त्याची अधिसूचना जाहीर केली जाईल.
- जर वित्त मंत्रालयाने या शिफारशी स्वीकारल्या नाहीत तर त्या शिफारशी पुन्हा सीबीटी बोर्डाकडे पुनर्विचारासाठी पाठविल्या जातील.

























































