EPS पेन्शन संघटनेची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी, रक्ताने केल्या सह्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

इपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 डिसेंबर सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाचा आज आठव्या दिवशी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने रक्ताने सह्या करुन इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना पाठविले आहे.

इपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. अनेक महत्वपूर्ण मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे व निवेंदन देण्यात आली होती. त्या बाबत मंत्र्यांनी आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांची पूर्ती करावी यासाठी हे साखळी उपोषण आंदोलन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे. बुलढाणा येथील साखळी उपोषणात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे सह पदाधिकारी रामेश्वर शेंडगे, शोभा आरस, एस.एन. बैरवार, जे. आर. भावसार, डी.आर. साळोख, समाधान इंगळे, ए.के. राऊत, अशोक देशमुख, सुभाष थोरात, जे.जे. गरकल, ए.एन. सुरुशे, बी.बी. चव्हाण, विलास पाटील, श्रीराम शेळके, जे.आर. दळवी, महावीर काळे, बी.एस. नारखेडे, एस.एन. गवळी, वसंतराव देशमुख, मिना सिंग, सै. हाजी यांचे सह शेकडो पेंशनधारक सहभागी आहे. आज उपोषणाचा आठव्या दिवशी इपीएस पेन्शन धारकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रक्ताच्या सह्यांचे इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले आहे. जोपर्यंत इपीएस धारकांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सामनाशी बोलताना सांगितले आहे.