मतदानावेळी गडबड घोटाळा, मध्य प्रदेशात सापडल्या हॉटेलमध्ये ‘ईव्हीएम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व 230 मतदारसंघांत आज झालेल्या मतदानावेळी मोठय़ा प्रमाणावर ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड करून घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तब्बल 1145 ईव्हीएम आणि 1545 व्हीव्हीपॅट मशीन्स बदलाव्या लागल्या. दरम्यान, सुजालपूर येथील एका हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्यामुळे खळबळ उडाली. या गोंधळात मध्य प्रदेशात सरासरी 74.61 टक्के मतदान झाले आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व 230 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान झाले. मध्य प्रदेशात गेली 15 वर्षे भाजपचे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री आहेत. यावेळी भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही. सत्ताबदल होऊ शकतो असा विविध जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे. 2019 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालीम आहे. त्यामुळे आज मतदानासाठी आपआपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

हॉटेलमध्ये ईव्हीएम कशा आल्या?
सुजालपूर येथे एका हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन्स सापडल्याने खळबळ उडाली. विभागीय निवडणूक अधिकारी ईव्हीएम घेऊन हॉटेलमध्ये उतरला होता. किती ईव्हीएम सापडल्या, हॉटेलमध्ये कशाला अधिकारी ईव्हीएम घेऊन आला होता याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कांता राव यांनी दिली नाही, मात्र त्या ईव्हीएम जप्त केल्या असून संबंधित अधिकाऱयाला इलेक्शन डय़ुटीवरून हटवल्याचे राव यांनी सांगितले.

मिझोराममध्ये पोलिंग अधिकारी दारूच्या नशेत
मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान झाले. मतदान सरासरी 75 टक्के झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवरील तीन निवडणूक अधिकारी दारूच्या नशेत आढळले. यामध्ये प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि पाटबंधारे खात्याचा अभियंता आहे. या तिघांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

सब गोलमाल है!
– राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम बदलण्यात आल्या पण यात मतदानाचा वेळ वाया गेला आहे. वेळ वाढवून देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती अशी माहिती काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

– ‘ईव्हीएम’मध्ये गडबड आणि मशीन्स बंद पडल्यामुळे मतदानावर परिणाम झाला. मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्राबाहेर लांबच लांब रांगा होत्या असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले.

– इंदूर, धार, गुना जिल्हय़ात निवडणूक कामकाज पाहणाऱया तीन कर्मचाऱयांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

– राज्यभरातून आलेल्या तक्रारीनंतर 1145 ईव्हीएम आणि 1545 व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आल्या अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांता राव यांनी दिली.