
लोकशाहीसह ‘संविधान बचाव’ आंदोलनाला प्रतिसाद
देशाच्या निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणारी मतदान यंत्रे (ईव्हीएम) हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर लोकशाही व ‘संविधान बचाव अभियानां’तर्गत टप्प्याटप्प्याने जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. या जन आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
अभियानाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. राजेंद्र करंदीकर म्हणाले की, लोकशाही व संविधानाची हत्या करू पाहणाऱया आणि सामान्य हिंदुस्थानी नागरिकांचा मताधिकार संपवणारी यंत्रे मतदान प्रक्रियेतून हद्दपार करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण करणाऱया नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणे, सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांची पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंवरील जाचक कर आकारणी आणि त्यामुळे निर्माण झालेली महागाई रोखणे गरजेचे आहे. तसेच, शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी लोकशाहीर व ‘संविधान बचाव अभियाना’द्वारे जन आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे करंदीकर म्हणाले.
उपोषणाच्या दुसऱया दिवशी (दि.21) रोजी ‘हलगीनाद आंदोलन’, तर तिसऱया दिवशी (दि.22)घंटानाद आंदोलन करण्यात आले. सरकारला व निवडणूक आयोगाला जाग आणण्यासाठी आज (दि.23) चौथ्या दिवशी आंदोलकांनी संविधानाचा जागरण गोंधळ घातला. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 26) सकाळी 11 वाजता पारनेर बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. नवी पेठमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार आहे.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सद्भावना मंचाचे डॉ. रफिक सय्यद यांनी केले. यावेळी बाळासाहेब पातारे, राजेंद्र करंदीकर, संतोष वाडेकर, बाळासाहेब माळी, सुभाष लोंढे, रवींद्र साळवे, सतीश गोगडे, हसन राजे, अविनाश देशमुख, प्रदीप मोरे, योगेश सोनवणे, सुदाम कोरडे, मनोज सूर्यवंशी, वसंत कसबे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.




























































