पावसाची सटकली रे; लाखो विरार, वसईकर घरातच जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुसळधार पावसाने आज सलग तिसऱ्या दिवशीही मुंबई आणि परिसराला झोडपून काढले. पाण्याखाली गेलेले रेल्वे रूळ आणि रस्त्यांवर खोळंबलेल्या ट्रफिकने मुंबईचा वेग मंदावला. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलसेवा कोलमडली. रेल्वे स्थानकांमध्ये पाणी साचल्याने बोरिवली ते विरार ठप्प झाले. लांबपल्ल्याच्या एक्प्रेसना मुंबईबाहेरच ब्रेक लागला. नालासोपारा ते विरारदरम्यान एक्प्रेस गाडय़ांमध्ये अडकून पडलेल्या सुमारे सातशे प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची मदत घ्यावी लागली. पावसामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडणेही कठीण झाले. भरतीच्या वेळीच झालेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुंबईजवळच्या नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाने अक्षरशः धिंगाणा घातला होता. पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बडोदा एक्प्रेसमध्ये अडकलेल्या ७०० प्रवाशांना वाचवले
नालासोपारा ते वसईदरम्यान अडकलेल्या बडोदा एक्प्रेसमधील ७०० प्रवाशांच्या मदतीला एनडीआरएफची टीम धावली. एनडीआरएफचे ४२ जवान सहा बोटींतून बडोदा एक्प्रेसपर्यंत पोहोचले आणि त्यांनी या एक्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूपपणे नायगाव रेल्वे स्टेशनपर्यंत आणले. तेथे त्यांची जेवणाची सोय करून देण्यात आली. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

राज्यात अतिवृष्टीत ६२ मृत्यू
नागपूर – राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये १ जून ते ९ जुलै या कालावधीत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आतापर्यंत ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीत ६२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.