छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल येत्या 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रंगणार आहे. शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कला महोत्सवात सृजनशील कलाकृतींसोबत खाद्य महोत्सवाची मेजवानी, रसिकांना मुग्ध करणारी संगीत संध्या, लहान मुलांना प्रोत्साहन देणारी कलाशिबिरे असणार आहेत. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांचे प्रथमच होणारे प्रदर्शन.

महोत्सवाचे चारही दिवस सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांची समकालीन परदेशी चित्रकारांनी काढलेली व सध्या जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशामध्ये असणाऱ्या मूळ चित्रांच्या प्रतिमा प्रथमच मुंबईकरांना पाहता येतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील गेट क्रमांक 6 कडील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारकाच्या मागील जागेत हे प्रदर्शन असणार आहे. याशिवाय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्याकडे असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र कवडय़ांची माळ, शनिवार, 4 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते रात्री 10 तसेच रविवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत तसेच छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी पाडलेले सुवर्ण होन नाणे हे 4 व 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत मुंबईकरांना पाहता येणार आहे.

आदेश बांदेकरांसोबत दिलखुलास गप्पा

पार्क क्लबजवळील समुद्रकिनाऱ्यालगतच्या जागेत ‘कलासागर’ हे मनोरंजनाचे व्यासपीठ असणार आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्यासोबत दिलखुलास गप्पा रंगतील. ‘झी मराठी’ वाहिनीचे कलाकार येथे एकत्र येतील. ‘बे एके बे’ हा मराठी कविता व गाण्यांचा कार्यक्रमही  यावेळी सादर होईल. ‘सोनी मराठी’ वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘हास्यजत्रा’ च्या कलाकारांची टीम दादरकरांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे दादरमधील कर्तृत्ववान मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा सत्कार ‘सन्मान दादरकरांचा’ या उपक्रमाअंतर्गत करण्यात येईल. लिटिल स्टार हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व दादरमधील शाळेतील विद्यार्थ्यांचा गाणी व नृत्य कार्यक्रम कलासागरच्या मंचावर सादर होणार आहे.