मराठी भाषा भवन मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मराठी भाषा भवन उभे राहत असतानाच मराठी भाषेच्या विकासाची अनेक कामे होत आहेत. हे मराठी भाषा भवनच मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी व्यक्त केला. तसेच मराठी भाषेच्या नियोजन कार्यशाळेत व्यंगचित्र, ग्राफिटी आणि काव्य या विषयांच्या विशेष विभागाची सूचनाही त्यांनी केली.

मराठी भाषा भवनाचे स्वरूप ठरविण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात घेण्यात आलेली कार्यशाळा आज उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. मराठी भाषा भवनाचे काम राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग करीत आहे. ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मराठीप्रेमींच्या एका जिव्हाळय़ाच्या विषयावरचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने होत आहे ही बाब अत्यंत भावनिक आणि मनाला भिडणारी असल्याचे नीलम गोऱहे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात मराठी भाषेच्या विकासाचे काम होत असतानाच पद्य कविता, ग्राफिटी यांच्यासोबत व्यंगचित्र या महत्त्वाच्या कला प्रकाराची निर्मिती व त्याबाबतच्या प्रक्रिया याबाबतचे संहितीकरण भाषेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक मराठी साहित्यिक महत्त्वाच्या पैलूबाबत चिंतन व अभ्यास होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र क्षेत्रात विशेष योगदान होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत या विषयात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तीला त्यात स्थान असावे, असे आवाहन गोऱहे यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिकांना मराठी शब्दकोश पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. नीलम गोऱहे यांचाही मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी हे पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. या बैठकीला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रेणुका ओझरकर, भूपाल रामनाथकर आदी उपस्थित होते.

मराठीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही

मराठी भाषेच्या विकासासाठी राज्य सरकार विविध टप्प्यांवर कामे करणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे यावेळी मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.