
कोरोनाचे देशभरातील अपडेट सर्वसामान्यांना मिळण्यासाठी फेसबुकने कोरोना टूल तयार केले असून यात टूलवर बेड, अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन बेडसह लसीकरणाबद्दलची सर्व माहिती मिळणार आहे. अमेरिकेनंतर फेसबुकने हिंदुस्थानसाठी हे टूल सुरू केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी हिंदुस्थान अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाची स्थिती काय आहे याची अद्ययावत माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांसाठी हे टूल तयार करण्यात आले आहे. कोरोना विषाणूची माहिती सार्वजनिक आरोग्य अधिकाऱयांना देऊन कोरोनाविरोधातील मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हे टूल तयार करण्यात आले आहे, असे फेसबुकने म्हटले आहे. 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये हे सुरू करण्यासाठी त्यांच्यांशी भागीदारी करण्यात आली आहे.
टूलमध्ये हेल्पलाइन्स, जिह्यातील हॉस्पिटल बेडच्या उपलब्धतेवरील अपडेट्स असतील. यात अतिदक्षता विभाग, बेड्स आणि ऑक्सिजन बेड्सचा समावेश असेल.
सध्याच्या कोरोना नियम व कायद्यांमधील बदल यांची माहिती मिळणार आहे. उदा. लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि उपचार प्रोटोकॉल्समधील बदल याबद्दल माहिती असेल.
लस पात्रता आणि नोंदणीबद्दल आणि लसीकरण पुरवठय़ाबद्दल / लॉजिस्टिक्सबद्दल माहिती.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक वर्तणूक, आरोग्य उपाय याची माहिती यात असेल.



























































