पाथर्डी आगारात बससेवा सुरळीत करा, कार्यकर्त्यांनी केले आगार बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी आगाराला जास्त एस टी बसेस द्या, नादुरुस्त गाड्या तातडीने दुरुस्त करा, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा तसेच नगर ते पाथर्डी दररोज नियमितपणे दर एक तासाला बस सोडा या मागण्यांसाठी आज प्रवासी संघटनेचे चिटणीस मुकुंद गर्जे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यांनी आगार बंद आंदोलन केले.

परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले. कमी बस व त्यातही नादुरुस्त बसेस जास्त असल्याने सध्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून या पार्श्वभूमीवर गर्जे यांच्यासह आज अमोल गर्जे, मुकुंद आंधळे, परवेज मणियार, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे तसेच अक्षय शिरसाट, अमोल बाबुराव गर्जे, उबेद आतार, तन्मय फुटाणे, निलेश तुपे, गणेश गोंधळी, शुभम येळाई, राहुल ढाकणे, उजेर आतार, नजीर शेख यांनी पाथर्डी आगाराचे गेट बंद करत त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाची दखल विभागीय यंत्र अधीक्षक मुकुंद नरसाळे, विभागीय वाहतूक नियंत्रक अनिल भिसे व आगार प्रमुख आरिफ पटेल यांनी घेतली व ते आंदोलन स्थळी आले. या वेळी बोलताना मुकुंद गर्जे म्हणाले की, आगारातील बहुतेक गाड्या नादुरुस्त असल्याने रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले असून वेळेवर गाड्या सोडल्या जात नाहीत. यामुळे तातडीने बससेवा सुरळीत करा, अशी मागणी त्यांनी केली.