मुलींना इम्प्रेस करण्यासाठी घातला पोलिसांचा गणवेश, टीसीने तोतया सब इन्स्पेक्टरला पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीएसएमटी स्थानकात मध्य रेल्वेच्या टीसीने एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाला पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तोतया पोलीस उपनिरीक्षक कराडचा असून त्याने कोल्हापूरमधून 2,800 रुपयांमध्ये हा पोलिसाचा गणवेश शिवून घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.

यापूर्वी नकली टीसी, पोलीस शिपाई यांना विनातिकीट पकडण्यात तिकीट तपासनीसांना यश आले असले तरी थेट नकली पोलीस उपनिरीक्षकाला अटक होण्याची पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे.

मध्य रेल्वेचे हेड तिकीट कलेक्टर राजेश करलकर हे रविवारी सीएसएमटी स्थानकात ड्युटीवर बजावत असताना त्यांना जीएम बिल्डिंगसमोर एक पोलीस उपनिरीक्षक वेशातील इसम संशयास्पद पद्धतीने फिरताना दिसल्याने त्यांना संशय आला. करलकर यांनी त्याला आयकार्ड आणि तिकीट विचारले असता तो गोंधळला आणि त्याने तिकीट तसेच आयकार्ड नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरपीएफच्या मदतीने त्यास सीएसएमटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी त्याने त्याचे नाव नीलेश चव्हाण (29) असल्याचे सांगितले. चव्हाण कराडच्या वडगाव हवेली गावचा रहिवासी असून त्याने तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या पोलीस लाइन बावडा येथील विजय टेलरकडून 2800 रुपयांत हा गणवेश शिवून घेतल्याचे सांगितले.

नीलेश चव्हाण याने मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी पोलिसाचा गणवेश घातल्याचे जबाबात म्हटले आहे. नीलेश याला भादंवि कलम 420, 170, रेल्वे कायदा कलम 147 नुसार अटक करण्यात आली आहे.