अनुकंपा तत्त्वाच्या नावाखाली 23 जणांची बोगस भरती, पालिकेशी संबंधित तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोगस कागदपत्रांच्या आधारे 23 जणांना अनुपंपा तत्त्वावर पालिकेच्या सफाई विभागात नोकरी मिळवून देणाऱ्या एका रॅकेटचा भंडापह्ड झाला आहे. 8 ते 10 लाख रुपये घेऊन 23 जणांना नोकरी मिळवून देण्यात आली होती. मात्र हा बोगस कारभार उघडकीस येताच कुर्ला पोलिसांनी पालिकेच्या तिघा आजी-माजी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या. या रॅकेटमधील अन्य झोलर लोकांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.

2017 ते 2019 या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला येथील एल वॉर्ड (घनकचरा व्यवस्थापन) विभागात बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 राखीव हंगामी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. एका व्यक्तीने या 23 कामगारांच्या नियुक्तीची माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असता हा बोगस कारभार उघडकीस आला. त्यामुळे पालिका आयुक्तांनी संबंधित उपायुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याआधारे पालिकेतर्फे कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कुलदीप व्हटकर व पथकाने या बोगस कामगार भरतीचा तपास सुरू केला.

तेव्हा नागेश पवार, ल विभाग येथील वरिष्ठ लिपिक देवेंद्र गायकवाड, तत्कालीन वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नीता सुर्वे (62), तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अलका शेवाळे (60) हे व अन्य व्यक्तींचा बोगस नोकरभरती प्रक्रियेत सहभाग निश्चित झाला. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, ही बोगसगिरी समोर आल्यानंतर त्या 23 जणांना आधीच कामावरून काढण्यात आले होते.

आरोपींनी 23 जणांना पालिकेत कामाला लावतो अशी बतावणी करून प्रत्येकाची बोगस कागदपत्रांच्या आधारे पी. टी. फाईल तयार केली. मग प्रत्येकाकडून 8 ते 10 लाख रुपये घेऊन त्यांची व पालिकेची फसवणूक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.