मिंधे गटातील खोटय़ा पक्षप्रवेशाची पोलखोल; वेश केला नसल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मिंधे गटात प्रवेश केल्याचा डांगोरा पिटला गेला होता; परंतु आता त्याच कार्यकर्त्यांनी आपण प्रवेश केला नसल्याचे जाहीर केल्याने मिंधे गटाच्या खोटय़ा पक्षप्रवेशाची पोलखोल झाली आहे.

कोरेगावचे मिंधे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मध्वापूरवाडी (गणेशवाडी), अंगापूर वंदन, चिंचणेर निंब, कोलवडी, गोगावलेवाडी यांसह काही गावांच्या लोकांनी आपल्या गटात प्रवेश केल्याचे प्रसारमाध्यमांवर प्रसारित केले होते. ‘आमचा पक्ष प्रवेश झाला आहे’ असे दाखविलेल्या स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी रविवारी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेत याबाबतचा मोठा खुलासा करीत बनावट पक्षप्रवेशाची पोलखोल केली आहे.

आम्ही लोकोपयोगी व जनतेची काही कामे तेथे घेऊन गेलो असता, भेट घेण्याच्या नावाखाली आम्हाला फसवून घेऊन गेले आणि आम्ही प्रवेश केला असल्याचे चित्र मतदारसंघात दाखविल्याचे पाहायला मिळाले. मतदारसंघात विविध ठिकाणी प्रसिद्धी करून आपल्या विचारांना प्रमाण मानून प्रवेश केला असे चित्र भासविण्यात आल्याचे स्पष्टीकरण या कार्यकर्त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादीतील लोक याच पक्षात कार्यरत आहेत, याची प्रचिती आमदार शशिकांत शिंदे यांना भेट घेऊन लोक देत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात परिवर्तनाची चाहूल लागल्यानेच असे प्रताप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.