पाळीव पोपट उडून गेल्याने कुटुंब व्याकुळ; शोधून देणाऱ्यास 10 हजाराचे बक्षीस जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या अहमदाबादमधील प्रल्हादनगरमध्ये सागर शर्मा ( वय 43) त्यांची पत्नी परीणी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांनी घरात आफ्रिकन जातीचा करड्या रंगाचा पोपट पाळला होता. त्यांनी पेपर असे त्याचे नाव ठेवले होते. तो पोपट उडून गेल्याने शर्मा कुटुंब व्याकुळ झाले आहे. त्याला शोधून देणाऱ्याला त्यांनी 10 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच स्वतः शर्मा दररोज सहा ते सात तास पेपरचा शोध घेत आहेत.

पेपर तीन महिन्यांचा असताना शर्मा कुटुंबियांनी त्याला पाळण्यासाठी आणला होता. तो सुमारे 11 महिन्यांचा असताना 31 ऑगस्ट रोजी बाल्कनीतून अचानक बाहेर पडला आणि उडून गेला. त्यानंतर तो परत आलेला नाही. त्यामुळे शर्मा कुटुंबीय व्याकुळ झाले आहेत. पेपरला घरातील वातावरणाशी जुळवून घेता यावे, यासाठी त्यांनी घरात ठिकठिकाणी फांद्यांची छायाचित्रे आणि फांद्या ठेवल्या. त्याला झोके घेता यावे, यासाठी दरवाजामागे काथ्थ्याचे धागेही ठेवले होते. तो हरवल्यापासून दररोज त्याचा शोध घेण्यात येत आहे. शर्मा दररोज सहा ते सात तास कारने आसपासच्या भागात फिरतात आणि त्याला आवडणाऱ्या घंटीचा आवाज करतात. जेणेकरून परिसरात तो असल्यास आवाज ओळखून परत येईल. पेपर आमच्या तिसऱ्या अपत्यासारखा होता. त्यामुळे त्याला शोधून देणाऱ्यास 10 हजाराचे बक्षीस देणार असल्याचे परिणी यांनी सांगितले.

पेपरला शोधण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही जवळपासच्या दुकानात तो हरवल्याचे पत्रक लावले आहेत. सोशल मिडीयावर त्याची हरवल्याची माहिती आणि शोधून देणाऱ्याला बक्षीसाची माहिती दिली आहे. परिसरातील जनतेला त्याचा शोध घेण्याची विनंती केली आहे. दूधवाले, भाजीवाले, फेरीवाले, सुरक्षा रक्षकांना त्याचे छायाचित्र दिले आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळानाही त्याचा शोध घेण्याची विनंती केली आहे, असे परीणी यांनी सांगितले. पेपर हरवल्यानंतर शर्मा यांनी त्याचा पिंजरा इमारतीच्या मध्यभागी आणून ठेवला आहे. जेणेकरून पेपर जागा चुकला असल्यास त्याला आपली निवाऱ्याची जागा ओळखता यावी. आफ्रिकन ग्रे प्रजातीतील पोपट त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि बोलण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. कमी वेळेतच तो आमच्या आवाजाची नक्कल करण्यास शिकल्याचे शर्मा यांनी सांगितले. पेपर आमच्या कुटुंबातील सदस्य होता. त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना करणे अशक्य असल्याचे शर्मा यांच्या मुलांनी सांगितले. या पोपटांचे आयुष्य 60 ते 65 वर्षांचे असते. त्यामुळे तो आमच्यासोबत कायम राहणार होता. ते हरवल्याने मन कशातच लागत नाही, असे ते म्हणाले.

आतापर्यंत पोपट सापडल्याचे सांगत तीनजणांनी संपर्क साधला आहे. मात्र, त्यांनी आणलेला पोपट पाहिल्यावर तो पेपर नसल्याचे लक्षात आले. आम्ही आमच्या पेपरला शोधण्याचे प्रयत्न सोडणार नाही. आमच्यापरीने आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. पेपर परत येईल, असा विश्वास आम्हाला आहे. त्याच्यासाठी आम्ही बाल्कनीच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवत आहोत. जेणेकरून त्याला इमारत आणि त्याचे घर ओळखता यावे. पक्षीमित्रांशी संपर्क साधून मदत मिळवण्याची प्रयत्न करत असल्याचेही शर्मा म्हणाले.