आचरट सिम्बूचे पोस्टरला दुग्धाभिषेकाचे आवाहन, चाहत्यांची दूधचोरीला सुरुवात

62

सामना ऑनलाईन, चेन्नई

दक्षिणेकडील राज्यांमध्ये अभिनेत्यांवर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी दुधाची पाकीटं चोरायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. यामुळे दूध उत्पादक आणि वितरक धास्तावले असून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. दूध वितरकांच्या दुकानांना संरक्षण देण्याची ते मागणी करू लागले आहेत. पहाटेच्या वेळी दुधाची पाकीटं जेव्हा वितरणासाठी सज्ज असतात तेव्हाच ती पळवली जातात. यामुळे पहाटेच्या वेळी वितरण केंद्रांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

सिम्बू नावाचा आचरट अभिनेता या सगळ्या परिस्थितीला सध्या जास्त जबाबदार धरला जात आहे. त्याने चाहत्यांना आवाहन केलं होतं की त्याच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालण्यात यावा. या आवाहनानंतर त्याचे चाहते बेफामपणे दूध चोरी करायला लागले आहेत. त्याच्या या आवाहनामुळे हजारो लिटर दूध वाया गेलं आहे. या सिम्बूचा ‘वंधा राजवधान वारूवेन’ नावाचा चित्रपट येत आहे. त्याची पोस्टर्स सध्या चेन्नईमध्ये लागली असून या पोस्टर्सना अभिषेक घालण्यासाठी त्याचे चाहते दूध चोरी करायला लागले आहेत.

दूधउत्पादक आणि दूधवितरकांनी गेल्या 3 वर्षांपासून दुधाची नासाडी थांबवावी यासाठी पोस्टर्सना दुग्धाभिषेक करण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. त्यांनी यासाठी रजनीकांत, विजय, अजित यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांची भेटही घेतली होती. या अभिनेत्यांनी त्यांच्या चाहत्यांना दुग्धाभिषेक करू नये असे आवाहन करावे असी विनंती करण्यात आली होती. मात्र यातील एकाही नेत्याने त्याला प्रतिसाद दिला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या