
देवळा तालुक्यातील मेशी येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून अज्ञातांनी परस्पर 60 हजार रुपये काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
मेशी येथील केशव दगा पगार यांनी स्टेट बँकेकडून 2 लाख 27 हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. त्यापैकी काही रक्कम त्यांनी शेतीसाठी वापरली, तर मुलीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी एक लाखांहून अधिक रक्कम बचत खात्यात राखून ठेवली होती. गुरुवारी, 28 नोव्हेंबर रोजी बचत खात्यातून प्रथम 20 हजार व नंतर 40 हजार असे 60 हजार रुपये काढल्याचे संदेश त्यांना मिळाले. पगार यांनी शुक्रवारी स्टेट बँकेच्या देवळा शाखेशी संपर्क साधला असता ते पैसे दिल्ली येथून काढण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी पगार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बँकेच्या वतीनेही त्याचा तपास केला जात आहे.



























































