
सामना प्रतिनिधी । कळवण
कांद्याचे भाव नियंत्रणात राहावे यासाठी केंद्रशासनाच्या योजनेतून नाफेडमार्फत शेतकरी सहकारी संघाने कांदा खरेदी केला होता. सहा महिने उलटूनही नाफेडकडे शेतकरी संघाचे ७ लाख १९ हजार ७१३ रुपये घेणे आहे. हि रक्कम तात्काळ द्यावी नाहीतर नाफेडच्या कार्यालयासमोर शेतकरी संघाचे पदाधिकारी व कर्मचारी आमरण उपोषणास बसतील असा इशारा संघाचे चेअरमन निंबा पगार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक, जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड, पोलीस ठाणे पिंपळगाव आदींना देण्यात आले आहे.
मागील वर्षी गावठी कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र शासनाने विशेष योजनेतून नाफेडला कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाफेडने स्थानिक ठिकाणी दि 9 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून 5 हजार 188.45 क्विंटल कांदा खरेदी केला होता. कांदा खरेदी, साठवणूक, आडत, कमिशन, मार्केट फी, कांदा निवड , पॅकिंग व इतर खर्च पोटी 69 लाख37 हजार 463 रुपये इतकी रक्कम झाली होती. त्यापैकी नाफेडने संघाला 62 लाख 17 हजार 750 रुपये अदा केले आहेत. नाफेडकडे आज रोजी 7 लाख 19 हजार 713 रुपये बाकी आहे. शेतकरी संघाकडे स्वमालकीच्या कुठचाही निधी नसल्याने त्यांनी एका संस्थेकडून कर्जरूपाने निधी उभा केला होता. या व्यवहारात संस्थेला म्हणजे संघाला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा व्याजाचा बोजा जास्त झाल्याने संस्था तोट्यात आली आहे.
सदर रक्कम वसुलीसाठी संघाच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी समक्ष भेटून व लेखी मागणी करून मिळत नसल्याने दि 18 मार्च रोजी पिपंळगाव ता निफाड येथील नाफेडच्या कार्यालयासमोर शेतकरी संघाचे पदाधिकारी व कर्मचारी आमरण उपोषणास बसतील असा इशारा शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन निंबा पगार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी संघाचे व्यवस्थापक एल एस गांगुर्डे उपस्थित होते. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक, जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड, पोलीस ठाणे पिंपळगाव आदींना देण्यात आले आहे.
































































