गावगुंडाच्या दहशतीमुळे वृद्धाची आत्महत्या, शेवगाव तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने अपहरण करून वृद्धाला जबर मारहाण करण्यात आली. गावगुंडांच्या या दहशतीला घाबरून वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे घडली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक किसन मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. मुकेश दत्तात्रय मानकर, रूपेश दत्तात्रय मानकर व मच्छिंद्र एकनाथ धनवडे (सर्व रा. गदेवाडी, ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विनायक मडके हे आठ दिवसांपूर्वी घोडय़ावरून आपल्या शेतात चालले असता फॉर्च्युनर गाडीतून जाणाऱया वरील तिघांनी त्यांना कट मारला होता. मडके यांनी याचा जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. दुसऱया दिवशी मडके गावात गेले असता वरील तिघांनी त्यांना दारूसाठी पैसे मागितले. मात्र, पैसे न दिल्याने त्यांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मडके यांनी घरच्यांना हा प्रकार सांगितला. गुरुवारी (दि. 9) आरोपींनी मडके यांचे अपहरण केले. यावेळी त्यांना प्रतिकार करणाऱया मडके यांचा मुलगा तुळशिराम याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. घरच्यांनी मडके यांचा शोध घेतला असता सुयोग हॉटेलसमोर तिघे आरोपी त्यांना मारहाण करत असल्याचे दिसून आले. यानंतर तुळशिराम याने फोन करून भावाला बोलावून घेतले. आरोपी निघून गेल्यानंतर शोध घेतला विनायक मडके यांनी हॉटेल सुयोगच्या पाठीमागे असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यांना शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी तुळशिराम मडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील तपास करीत आहेत.