
सामना प्रतिनिधी । जालना
चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील आमराईत सोमवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अशोक कांबळे या सालगड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महादेववाडी (ब्रम्हवाडी) येथील रहिवासी अशोक कांबळे हे चापोली येथील गुरुशांत कासनाळे या शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. सोमवारी ते आपल्या गावाकडून शेताकडे जात असताना पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील आमराईत एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यानंतर वाहनचालक तेथून पळून गेला. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. अशोक कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पंचनामा बीट जमादार सुभाष हरणे यांनी केला असून पुढील तपास ते करीत आहेत.

























































