
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आनेक गावातील सिंगल फेज व थ्री फेजचे ट्रॉन्सफॉर्मर जळाल्यामुळे दुरुस्ती अभावी गेल्या २० ते २५ दिवसापासून तालुक्यातील उजेड, उमरदरा, रापका, कारेवाडी, बिबराळ, बोळेगाव, आनंद वाडि गावे अंधारात आहेत. त्या गावांना पाणीपुरवठा करणारे थ्री फेस ट्रॉन्सफार्म जळाल्यामुळे संबधित गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याबाबतीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार शिरुर अनंतपाळ यांनी महावितरणच्या विभागीय व उपविभागीय अभियंत्याना तत्काळ नादुरुस्त झालेले ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी आदेश काढले. पण निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळे संबधीत गावचे सरपंच व ग्रामस्थांनी शिरुर अनंतपाळच्या महावितरण कार्यालया पुढे बुधवारी रात्रीच्या वेळीच ठिय्या आंदोलन केले.
मांजरा नदी काठी असलेल्या उजेड गावात अनेक दिवसापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अगोदरच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असून जमिनीतील पाणी पातळी खोलीवर गेली आहे, थोडेफार असलेल्या विंधन विहीरीचे, बोअरचे महावितरणच्या आधिकाऱ्यांनी थकबाकीचे सोंग करून जळालेले ट्रॉन्सफॉर्म बसविण्यासाठी टाळाटाळ चालु केली आहे. संबधीत ग्रामपंचायतीने महावितरणचे काही बीलही भरले, परंतु महावितरणचे कर्मचारी व अधिकारी वीजपूरवठा पूर्ववत करीत नसल्यामुळे असलेले बोअरचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. त्यामुळे मांजरा नदी काठावरील उजेडला थोडेफार असलेले पाणी असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे
संबधित ग्रामपंचायतीला प्रशासनाने दोन बोअर अधिग्रहित करण्याची परवांनगी दिली. पण ट्रान्सफॉर्मर जळाले त्यामुळे उजेड सारखीच अवस्था अनेक ग्रामपंचायतीची झाली आहे. उजेडचे संरपंच हमीद पटेल यांनी सामना प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “गावास पाणी मिळावे म्हणून, पाणी पुरवठा यंत्रणेसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने दिली पण फायदा झाला नाही. त्यामुळे सरपंच हतबल झाले आहेत.
मांजरा नदी कोरडी पडली पण डोंगरगाव बॅरेजेस उजेडकरांच्या उशाला आहे. त्यामुळे बॅरेजेस मध्ये मुबलक पाणी असून उजेडकरांना संबधित विभागाने यंत्रना कार्यान्वित करुन उजेडकरांना पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. धरण उशाला आण कोरड घशाला म्हणण्याची वेळ उजेडकरानवर आली आहे .
संबधीत गावाना पाणीपुरवठा करणारे बोअर विहीरी आहेत त्या ठिकाणाचे ट्रॉन्सफार्मर जळाले आहेत. संबधीत महावितरण विभागाची थकबाकी भरल्याशिवाय त्यांच्या फाईली हलत नाहीत. पण उजेड ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे असलेल्या थकबाकी पैकी १८००० हजार रुपयांचा भरणा केल्याचे सरपंच पटेल यांनी सांगितले. जोपर्यत ट्रॉन्सफार्मर बसणार नाहीत तोपर्यंत महावितरण कार्यालया पुढे ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असे सरपंच संघटनेचे ता. उपाध्यक्ष हमीद पटेल यांनी सांगितले.
यावेळी उजेड हमीद पटेल, उमरदरा राम नलवाडे, बिबराळ प्रल्हाद जन्मले, आरी हरीभाऊ गुरमे, कारेवाडी , बोळेगाव उध्दव कांबळे, आनंदवाडी माधव चलमले, रापका गावचे सरपंच सह ग्रामस्थ व तालुक्यातील मोठया प्रमाणात शेतकरी ही या आंदोलनात सहभागी होते
संबधित महावितरणचे शिरूर अनंतपाळचे अभियंता पटवारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.






























































