कृषी विधेयकाच्या विरोधात चक्का जाम, पंजाबात शेतकऱयांचा रेल्वे रुळावर  मुक्काम

मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरातील शेतकऱयांनी एल्गार पुकारला आहे. या विधेयकाच्या विरोधात आज विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंजाबात शेतकऱयांनी दुसऱया दिवशीही रेल्वे रुळावर  मुक्काम ठोकला तर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ठिकठिकाणी आंदोलन केले. विधेयकाच्या विरोधात हरियाणातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर धडक मारली असून पश्चिम बंगालमध्येही या विधेयकाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आले आहेत.

नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारने तीन कृषी विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करून घेतली. ही विधेयके शेतीविरोधी असल्याचा आरोप करत देशभरातील शेतकरी संघटनांनी त्याविरोधात एल्गार पुकारला आहे. आंदोलनाची सुरूवात पंजाब, हरियाणातून झाली. पंजाबात किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी दोन दिवसांपासून रेल्वे रुळावर  मुक्काम ठोकून आहेत. शुक्रवारीही शेतकऱयांनी अनेक रेल्वे रोखल्या. त्यामुळे बऱयाच गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. समितीने पुकारलेल्या बंदलाही राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. हरियाणातही विधेयकाच्या विरोधात आडत बाजार कडकडीत बंद होता. राज्यात आजही शेतकऱयांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक खोळंबली. बिहारमध्ये राजदच्या कार्यकर्त्यांनी म्हशीवर बसून या विधेयकाचा निषेध केला. तर पाटण्यात तेजस्वी यादव यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. कर्नाटक क तामिळनाडूच्या शेतकऱयांनी बोमनहल्ली येथे महामार्ग रोखून धरला आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवरही शेतकऱयांनी धडक मारली. शेतकऱयांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून विधेयक मागे घेण्याची मागणी केली.

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे आंदोलन 

मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये शेतकऱयांनी डाव्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले. तीनही विधेयक मागे घेण्यात यावीत यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या