स्वयंचलित उपकरणामुळे मिळणार हवामानाचे अपडेट… शेतकऱ्यांना होणार फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
farmer
गाव गरीब किसान ही सरकारची प्राथमिकता

सामना प्रतिनिधी । कळवण

हवामानात सातत्याने होणाऱया बदलासोबतच तापमान, पर्जन्यमान, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अशा अनेक बाबी समजण्यासाठी कळवण महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वयंचलित हवामान उपकरणाचा पन्नास ते सत्तर किलोमीटर परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी व शेतकऱयांना फायदा होणार आहे. हवामानाची इत्थंभूत माहिती या उपकरणाद्वारे मिळणार असल्याने शेतकऱयांसह खगोलशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.

मानूर येथील कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि हवामान विज्ञान विभाग यांच्या वतीने हे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान स्थानक बसविण्यात आले आहे. अंदाजे 27 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या उपकरणाच्या माध्यमातून कमाल, किमान व सरासरी तापमान तसेच सरासरी पर्जन्यमान, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, वाऱयाचा दर ताशी वेग, वाऱयाची दिशा, वाऱयाचा दाब (मिलिबारमध्ये), सूर्योदय, सूर्यास्त वेळ, सूर्यप्रकाश किती वेळ उपलब्ध आहे आदी हवामानाबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. या स्वयंचलित हवामान उपकरणात पन्नास ते सत्तर किलोमीटर परिसरातील हवामानाची स्थिती संकलित होणार असल्याने पुढील हवामानाचा अंदाज वर्तवणे शेतकऱयांना शक्य होणार आहे.

या उपकरणाच्या माध्यमातून हवामानाची माहिती समजल्याने शेतकऱयांना संभाव्य नुकसान टाळता येणार आहे. कळवण महाविद्यालय परिसरात हे अत्याधुनिक उपकरण उभारण्यात आल्यामुळे ग्रामीण आणि अदिवासी भागातल्या शेतकऱयांना हवामानाची माहिती घेणे सोपे होणार आहे.

वेबसाईटवर बघता येणार स्थिती

कळवण महाविद्यालयातील हे वेदर स्टेशन हवामान विभागाशी कनेक्ट करण्यात आलेले असून aws.imd.gov.in या वेबसाईटवर हवामानाची स्थिती बघता येणार आहे. या वेबसाईटवर aws data या पर्यायावर क्लिक करून त्यात राज्य-महाराष्ट्र, जिल्हा-नाशिक आणि स्टेशन-कळवण असा पर्याय निवडल्यानंतर माहिती उपलब्ध होणार आहे. दर तासाची माहिती अद्ययावत होत असून आलेखही बघता येणार आहे.

शेतकऱयांना नियोजन करणे होईल सोपे

या वेधशाळा उपकरणाद्वारे प्राप्त होणारी हवामानविषयक माहिती कळवण परिसरातील अधिकाधिक लोकांना मिळावी. बदलत्या हवामानानुसार शेतकऱयांना शेतीकामाचे नियोजन करणे सोपे व्हावे या हेतूने हे वेदर स्टेशन कार्यान्वित केले आहे.
– डॉ. उषा शिंदे, प्राचार्य, कळवण महाविद्यालय