एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूधभुकटीचा बफर स्टॉक करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात मोर्चा काढला आहे. अलका चौक ते साखर संकुल असा हा मोर्चा असणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मोर्चाबाबत माहिती दिली होती.

सरकारने ऊस उत्पादकांना एफआरपी आणि त्यावर दोनशे रुपये देण्याचे कबूल केले होते. मध्यंतरी दर कोसळल्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी होत्या. त्यामुळे आम्ही संयम राखला. आता सरकारने साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपये ठरविला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना कर्जाची उचल मिळणार आहे. त्याच्या अंमलबजावणीचा आदेश सरकारने काढण्याची गरज आहे. बाजारातील स्थिती सकारात्मक असल्याने तातडीने एफआरपीची रक्कम द्यावी अशी शेट्टी यांनी मागणी केली आहे.

भाकरी फिरवता फिरवता आमचा तवादेखील करपला
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतरदेखील झाले. मात्र, भाकरी फिरविता फिरविता आमचा तवादेखील करपून गेला, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना टोला लगावला. निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय अद्यापी झालेला नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.