बोगस बियाण्यांच्या मिरची रोपांमुळे मालेगावातील शेतकऱ्यांची फसवणूक

34

सामना प्रतिनिधी । नाशिक

सिमला मिरचीच्या बोगस बियाण्यांच्या रोपांची लागवड केल्याने मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विचित्र आकाराचे, निकृष्ट दर्जाचे अत्यल्प उत्पादन निघत आहे. फसवणूक झाल्याने शेतकरी हवालदील आहेत.

सिन्नर-घोटी महामार्ग, दिंडोरी आणि मोहाडी-जानोरी रस्त्यावरील रोपवाटिकांमधून शेतकऱ्यांनी ‘सेमीनीज 1865’ या जातीची सिमला मिरचीची रोपे खरेदी केली होती. मालेगाव तालुक्यातील सातमाने, ढवळेश्वर, वडनेर शिवार, चिंचावड, दाभाडी या भागातील तीसहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या रोपांची लागवड केली. मोठा खर्च करून शेडनेटमध्ये सुमारे तीस एकर क्षेत्रावर या मिरचीचे उत्पादन घेण्यात आले आहे. आता उत्पादन हाताशी आले आहे. या मिरचीचा आकार नेहमीच्या मिरच्यांपेक्षा वेगळाच आहे. बोगस बियाण्यांची रोपे तयार करण्यात आली व तीच आपण खरेदी केली असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. मालेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे यासंदर्भात पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. संबंधित कंपनी व रोपवाटिका मालकांवर कारवाई करण्यात यावी, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशाच प्रकारची फसवणूक जिल्ह्यात अन्य ठिकाणी झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

उत्पादनापेक्षा 50 टक्केच उत्पादन
मिरचीचे वजनही कमी आहे. रोपवाटिकाधारकाने सांगितलेल्या उत्पादनापेक्षा पन्नास टक्केच उत्पादन येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. वेगळा आकार व कमी वजन असल्याने या मिरचीला भावही अत्यल्प मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या