
सामना ऑनलाईन, अमृतसर
पूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच शेतजमिनींचा लिलाव आणि त्यांचे अटकसत्र रोखण्याची मागणी करीत पंजाबातील शेतकरी आज रेल्वे मार्गावर उतरले. त्यांच्या या आंदोलनामुळे 38 ट्रेन रद्द कराव्या लागल्या. तसेच दिल्ली-अमृतसर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अमृतसर-नवी दिल्ली एक्सप्रेस, अमृतसर-चंदीगड एक्सप्रेस, हरिद्वार-अमृतसर जनशताब्दी एक्सप्रेस, नवी दिल्ली – जालंधर सिटी इंटरसिटी एक्सप्रेस यासारख्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. 11 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले. तर 8 ट्रेनचा प्रवास अर्ध्यावरच समाप्त करण्यात आला.
- या आंदोलनात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, असे अमृतसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमाल सिंह यांनी सांगितले.
- उसाच्या किमतीची रक्कम 15 टक्के व्याजासहित शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशीही मागणी पंजाबातील शेतकऱ्यांनी रेल रोको करून केली.
- शेतकऱ्यांच्या आजच्या ‘रेल रोको’ आंदोलनाचा फटका 85 हजार प्रवाशांना बसला, असे पंजाबचे ऍटोर्नी जनरल अतुल नंदा यांनी न्यायालयाला सांगितले.




























































