नापिकीला कंटाळून अमरावतीत वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

23

सामना प्रतिनिधी । अमरावती

मागील चार वर्षांपासून सतत नापिकी तर यंदा सोयाबीन, कपाशीची पेरणी केल्यानंतर पावसाच्या खंडतेमुळे दोन्ही पिके डोळ्यासमोर करपल्याचे पाहून एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याने वर्धा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकनगर या गावी मंगळवारी उशिरा उघडकीस आली. यंदाच्या खरीप हंगामातील ही पहिली आत्महत्या असल्याची माहिती आहे. भास्कर दत्तूजी राजनकर असे जीवनयात्रा संपविलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

तालुक्यातील अशोकनगर येथे ते मागील अनेक वर्षापासून पाच एकर शेतीत उत्पन्न घेऊन आपल्या संसाराचा गाढा चालवीत असत जून महिन्यात या परिसरात पहिला दमदार पाऊस झाल्याने दोन एकर शेतात कपाशी तर तीन एकरमध्ये सोयाबीनची पेरणी उसनवारी घेऊन त्यांनी केली होती. दोन्ही पिके शेतात उभी राहिली. मात्र दहा दिवसांपासून पाऊसच नसल्याने वाढत्या तापमानाने या पिकांनी माना खाली टाकल्या. तर अर्ध्या शेतातील पिके करपली आहे. दररोज प्रमाणे मंगळवारी भास्कर राजनकर हे सकाळी आठ वाजता पाणी आणि भाकरी घेऊन शेतात गेले. परंतु दुपारी घरी परत आले नाहीत.

दरम्यान, वर्धा नदीच्या पात्रात एक मृतदेह काठावर शेत मजुरांना दिसला. तो पाण्याबाहेर काढला असता तो भास्कर दत्तूजी राजनकर यांचा असल्याचे उघड झाले. भास्कर यांच्यावर अशोकनगर सेवा सहकारी सोसायटीचे एक लाखाचे कर्ज आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली आहेत. सोसायटीचे कर्ज व यंदा उसनवारी घेऊन पिकवलेले शेत वाया गेले. पावसाने दगा दिला. पिकाची अवस्था पाहून आपल्या वडीलांनी विदर्भ नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा राजाभाऊ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या