
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरीचा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर देशाचे व राज्याचे नेतृत्व करणारे कुठे होते? हा सवाल करत राहुरीच्या ऊसावर उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना अगामी लोकसभा निवडणुकीत राहुरीत मते मागण्याचा नैतिक अधिकार राहिला नसल्याचा टोला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीचे नाव न घेता लगावला.
अगामी लोकसभा निवडणुकी निमित्ताने राहुरी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले होते. विखे म्हणाले की अलिकडच्या काळात राजकारण फार अवघड झाले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका काय ही विचारणा झाली असता अनेकांनी भाजपा पक्ष योग्य असल्याचे सांगितले. म्हणूनच भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. नगरच्या जागेबाबत राजकारण करत अनेक पक्ष आज एकञ झाले. मी कुणाचे काय वाईट केले हेच समजत नाही. माझ्या प्रचारात माझे वडील राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे नाहीत हे सर्वात मोठे दु:ख असले तरी आमदार शिवाजी कर्डीले तसेच राहुरीची जनता कुटूंबप्रमुखांप्रमाणेच आपल्या पाठिशी उभी असल्याचा आनंद मोठा आहे.
३०० कोटी रुपये कर्जबाजारी असलेला राहुरीचा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना विखेंच्या ताब्यात देऊ नका, असे जिल्ह्यातील मातब्बर मंडळीकडून सांगितले गेले. माञ माझ्यावर मुलाप्रमाणे विश्वास ठेऊन साखर कारखाना सुरू करण्यास आमदार कर्डीले यांनी मदत केली. माझ्यावर विश्वास नसता तर आमदार कर्डीले यांनी मदत केली नसती. अगामी लोकसभा निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या भूमिकेबाबत विरोधकांकडून राजकीय रान उठविले जात असले तरी कर्डीले माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने लोकसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचे विखे म्हणाले.
शिवाजी कर्डीले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतात ते कधीच करीत नाहीत. हे देशातील जनतेला माहिती आहे. शिवसेना व भाजपा सरकारमुळे मी आमदार झालो. त्या सरकारला फसविण्याचे काम माझ्याकडून कदापी होणार नाही. विखेंना निवडून आणण्याची माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. राधाकृष्ण विखे यांची काँग्रेस नेतृत्वाने केलेली स्टार प्रचारक म्हणून निवड ही सत्ता मिळवण्यासाठी खटाटोप असल्याची टिका कर्डीले यांनी केली. मी सर्व राजकीय पक्षात फिरलो माञ युती सरकार मध्ये मतदार संघात विकास कामे करण्याचे मोठे समाधान मला मिळाले. शिवसेना व भाजपा सरकारमुळे निळवंडे कालव्याचे काम सुरू होण्यास मदत झाल्याचे कर्डीले यांनी आवर्जुन सांगितले. सुजय विखेचे भविष्य तनपुरे सहकारी साखर कारखाना ताब्यात देतानाच सांगितले होते. अगामी लोकसभा निवडणुकीत चिंता करू नका राज्यात व देशात निकालात नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ नंबर एक राहणार असल्याचा ठाम विश्वास आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे यांची भाषणे झाली. या मेळाव्यास तनपुरे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष उदयसिंह पाटील, भानुदास बेरड, कारखाना संचालक रवींद्र म्हसे, पोपटराव जाधव, नगरसेवक शहाजी जाधव,दिलीप राका, सदाशिव शेळके, आबासाहेब भुजाडी, राजेंद्र वराळे, सुरेश शेटे, नरेंद्र शिंदे, गणेश खैरे, अतिक बागवान, बिलाल शेख, उमेश शेळके, सचिन मेहेञेंसह राहुरी भागातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































